राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात एका मजुराला जिवंत जाळून त्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या शंभूलाल रैगरने केली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. लव्ह जिहादमधून हे प्रकरण घडल्याची बातमीही जानेवारी महिन्यात समोर आली होती. आता हाच शंभूलाल रैगर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने (उत्तर प्रदेशातील एक राजकीय पक्ष) शंभूलालला लोकसभेचे तिकिट ऑफर केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शंभूलालने ही ऑफर स्वीकारली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात शंभूलालने मोहम्मद अफरजुलची हत्या केली होती. मोहम्मद अफरजुल हा राजस्थान येथील राजसमंदमध्ये मजुरी करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. ज्यानंतर शंभूलालच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. काही हिंदू संघटनांमध्ये शंभूलाल चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्याच्या सन्मानार्थ काही संघटनांनी रॅलीही काढल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या. आता याच शंभूलालला उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने तिकिट दिल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण
शंभूलालने मुस्लिम मजुराला शेतात नेले. त्यानंतर त्याच्या अंगावर कुऱ्हाडीचे वार केले. या जखमांमुळे तो मजूर तडफडत होता. त्याचवेळी शंभूलालने या मजुराच्या अंगावर रॉकेल ओतले आणि त्याला जिवंत जाळले. क्रौर्याचा कळस गाठत शंभूलालने या सगळ्या घटनेचा व्हिडिओ मोबाइलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरलही केला. जिहादी लोकांनी आपल्या देशातून निघून गेले पाहिजे अशा घोषणाही शंभूलाल व्हिडिओत देत होता.

या घटनेमुळे आणि व्हिडिओमुळे सगळा देश हादरला होता. यानंतर हे सगळे प्रकरण लव्ह जिहादमधून घडल्याचे समोर आले होते.  या प्रकरणात राजसमंद जिल्हा न्यायालयासमोर ४०० पानी चार्जशीट ठेवण्यात आली. या चार्जशीटमध्ये शंभूलालची पत्नी आणि त्याची प्रेयसी नर्स या दोघींना साक्षीदार करण्यात आले. शंभूलालला उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने तिकिट ऑफर करत आग्रा येथून लढण्याची विनंती केली आहे जी त्याने स्वीकारल्याचीही माहिती कळते आहे.