अन्य छोटय़ा पक्षाला सत्तेत स्थान देण्याची कर्नाटकात काँग्रेसने दाखवलेली भूमिका समंजसपणाची असून ती त्यांनी महाराष्ट्रासह अन्यत्रही दाखवावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केली. महाबळेश्वर येथे विश्रांतीसाठी आलेल्या पवार यांनी कर्नाटकातील घडामोडींवर वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

पवार म्हणाले, की कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार बनविण्यासाठी काँग्रेसची भूमिका समंजसपणाची होती. आपल्याकडे बहुमत नाही याची पहिल्यापासून काँग्रेसला जाणीव असल्याने अन्य छोटय़ा पक्षाचे सरकार स्थापन करण्याची त्यांची भूमिका ही शहाणपणा आणि पोक्तपणाची आहे. महाराष्ट्रात आम्ही दोन्ही काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवत आहोत. हीच समंजसपणाची भूमिका इथेही राहावी.

दरम्यान बहुमत नसतानाही येडियुरप्पांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय म्हणजे संसदीय लोकशाहीवर आघात होता. कर्नाटकाच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही. त्यांनी लोकशाहीवर उलटा आघातच केला, त्यामुळे ते राजीनामा देतील अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.