आज सकाळीच ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं. त्याबद्दल सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक राजकीय नेते, अभिनेते यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्हा दोघांचं एक वेगळंच नातं होतं असं म्हणत त्यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहिलं तेव्हाचा किस्सा शरद पवार यांनी यावेळी सांगितला. ते म्हणाले, “तेव्हा आम्हाला कळलं होतं की पुण्यातल्या जेजुरीजवळ दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. ते पाहायला आम्ही सायकलवरुन गेलो होतो. तेव्हा दिलीप कुमार यांना पहिल्यांदा जवळून पाहण्याची संधी मिळाली”.
ते पुढे म्हणाले, “पुढे विधीमंडळात, राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर दिलीप कुमार आणि माझं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आग्रह करुन एखादी दुसरी सभा घेण्यासाठी येत असत”.

हेही वाचा-ना उम्र की सीमा हो….जाणून घ्या सायरा बानो-दिलीप कुमार यांची Love Story

दिलीप कुमार हे फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय होते हे सांगत असताना ते म्हणाले, आम्ही जेव्हा परदेशात त्यांच्यासोबत गेलो होतो. विशेषतः इजिप्त, जपान अशा देशांमध्ये तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. इजिप्तसारख्या देशातही त्यांना पाहण्यासाठी विशेषतः तरुणांची फार गर्दी व्हायची. त्यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती सीमित नव्हती.

दिलीप कुमार यांनी भारत पाकिस्तान, भारत चीन अशा युद्धांच्या दरम्यान भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायम सहकार्य केलं, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

आणखी वाचा-“जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा…”, अमिताभ बच्चन झाले भावूक

दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वी मी त्यांना भेटूनही आलो होतो. पण मी माझ्या एक जवळच्या स्नेह्याला आज मुकलो. दिलीप कुमार यांना जेवढं आयुष्य लाभलं, त्यात त्यांनी कलेची अखंड सेवा केली. त्यांच्या या सेवेबद्दल आणि त्यांना कृतज्ञ राहायला हवं. मरणानंतर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना मी धीर देतो.