पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी सध्याच्या इंधन दरवाढीसाठी काँग्रेसप्रणीत सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यावर आता राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे. केंद्रामध्ये सहा वर्षे सत्तेत राहून देखील त्यांना चुका दुरुस्त करता येत नसतील तर त्यावर काय चर्चा करणार असा टोला पवारांनी लगावला आहे. मागील १२ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असून अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ पोहचले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रती लीटर ९५ रुपयांहून अधिक किंमतीला विकलं जात आहे. यावरुन शरद पवारांनी मोदी सरकारला टोला लगावलाय.

पुण्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या शरद पवार यांना पत्रकारांनी इंधनदरवाढीवरील आरोप-प्रत्यारोपांसंदर्भात छेडले असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. केंद्र सरकारमध्ये मागील सहा वर्षांपासून सत्तेत राहूनही चुका दुरुस्त करता येत नसतील तर त्यावर काय चर्चा करावी, असं शरद पवार यांनी इंधनदरवाढीसंदर्भात मोदींनी केलेल्या आरोपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा म्हटलं.  पेट्रोलने शंभरी गाठल्याचा दोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षरीत्या यापूर्वीच्या सरकारांना दिला आहे. यापूर्वीच्या सरकारांनी देशाचे तेल आयातीवरील अवलंबून राहणे कमी करण्यावर लक्ष दिले असते, तर मध्यमवर्गीयांवर दरवाढीचा भार पडला नसता, असे त्यांनी बुधवारी सांगितले.

मोदी नक्की काय म्हणाले होते?

पंतप्रधानांनी इंधनदरवाढीचा ठपका पूर्वीच्या सरकारवर ठेवला शिवाय आधीच्या सरकारने या विषयावर लक्ष केंद्रित केलं असतं तर सर्वसामान्यांवर दरवाढीचा बोजा पडला नसता असं म्हटलं आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षांत भारताने आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्क्यांहून अधिक, तर नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी ५३ टक्के निर्यात केली, असे मोदी यांनी आंतरराष्ट्रीय दरांशी संलग्न असलेल्या इंधनाच्या किरकोळ दरांत सतत होत असलेल्या वाढीचा उल्लेख न करता सांगितले.  ‘आमच्यासारखा वैविध्यपूर्ण आणि प्रतिभावान देश इंधनासाठी आयातीवर इतका अवलंबून कसा राहू शकतो?’, असा प्रश्न तमिळनाडूतील तेल व नैसर्गिक वायू प्रकल्पांच्या उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात मोदी यांनी विचारला. ‘मी कुणावर टीका करू इच्छित नाही, मात्र आपण या विषयावर खूप पूर्वीच लक्ष केंद्रित केले असते, आपल्या मध्यमवर्गावर दरवाढीचा इतका बोजा पडला नसता’, असे मोदी म्हणाले.

‘वो जुमलों का शोर मचाते हैं, हम…’, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर राहुल गांधींची शेरोशायरी!

प्रियंका गांधींचाही टोला…

देशात सातत्याने सुरू असलेल्या इंधन दर वाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ”भाजपा सरकारला आठवड्यातील त्या दिवसाचं नाव ‘अच्छा दिन’ करायला हवं ज्या दिवशी डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ होणार नाही. कारम वाढत्या महागाईच्या काळात अन्य दिवस तर सर्वसामान्यांसाठी ‘महंगे दिन’ आहेत.” असं प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील इंधन दर वाढीवरून मोदी सरकारवर टीका केलेली आहे. त्यांनी महागाईच्या संबंधातील सर्व हेडलाइन्सचा एक फोटो शेअर करत, महागाईचा विकास असं ट्विट केलं आहे. तर, रॉबर्ट वढेरा यांनी देखील ट्विट करत, जोपर्यंत इंधन दर कमी होत नाही तोपर्यंत मी कार्यालयात सायकलने जाणार आहे, असं जाहीर केलं आहे.