मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजारामध्ये बुधवारी पाहायला मिळालेली विक्रमी तेजी आज देखील कायम आहे. आज सकाळी मार्केट सुरू होताच इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजारांवर पोहोचला आहे. निफ्टीनेही पहिल्यांदाच ११४९५ ची पातळी गाठली. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली.
सकाळच्या सत्रामध्ये आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बॅंकेच्या शेअर्सची सर्वाधिक खरेदी झाली आहे. याशिवाय एसबीआय, आयटीसी, बँकेचे शेअर्सचे दरही वधारले आहेत. एचपीसीएल, बीपीसीएल, हिंदाल्को, वेदांता यांचीही कामगिरी चांगली झाली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनाने उचललेल्या पावलांमुळे खासगी बॅंकांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.शेअर बाजारातील तेजीचा परिणाम रुपयावर झाला असून डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी रुपया बळकट झाला आहे. आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी आशियाच्या बाजारांमध्ये सर्वत्र तेजी पाहायला मिळत आहे. जपानव्यतिरिक्त सर्वत्र शेअर बाजारामध्ये तेजीचं वातावरण असल्याचं चित्र आहे. या विक्रमी उंचीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 9:34 am