भाजपला सातत्याने घरचा आहेर देणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील नेत्यांवर निशाणा साधला. ते गुरूवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींनी भ्रष्टाचारविरोधी मोहीमेसाठी तयार केलेल्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’, या घोषणेची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली. मी ‘ना जिऊंगा ना जिने दुंगा’, अशी शपथ घेऊन राजकारणात आलेलो नाही, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही त्यांनी एका कार्यक्रमात, एखादा चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर मी अर्थव्यवस्थेवर का बोलू शकत नाही, असे विधान करून मोदींना थेट लक्ष्य केले होते.

गुजरात निवडणूक: मोदींच्या सभांआधी ‘मन की बात, चाय के साथ’चे आयोजन

त्यावेळी भाजप नेत्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणे टाळले होते. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी आता पुन्हा एकदा मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. देशात सध्या असे वातावरण आहे की, देशातील लोकांना ‘एकाच’ व्यक्तीचे समर्थन करावे लागते, अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहीपणाचा शिक्का लागू शकतो, असे सिन्हा यांनी म्हटले. याशिवाय, यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे खुशमस्कऱ्यांचा समूह आहे. यापैकी ९० टक्के लोकांना जनता ओळखतही नाही, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. मोदींच्या मंत्रिमंडळातील एकाही सदस्याच्या मनात काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा नाही. प्रत्येक मंत्री केवळ स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न करत आहे,’ अशा शब्दांमध्ये शॉटगन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींच्या मंत्रिमंडळावर शरसंधान साधले.

गुजरातमध्ये भाजपकडून ‘मन की बात’