राजधानीचा विकास साधणाऱ्या नेत्या हरपल्या

‘स्थलांतरितां’च्या दिल्लीला आधुनिक चेहरा देणाऱ्या, तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या, काँग्रेसी संस्कृतीच्या राजकारणात मुरलेल्या, अत्यंत नम्र असलेल्या आणि लोकांची आस्थेने चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ काँग्रेसनेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी खासगी रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.

शीला दीक्षित यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी रविवारी काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवले जाणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र माजी खासदार-काँग्रेस नेते संदीप दीक्षित आहेत. शीला दीक्षित यांना शनिवारी सकाळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्या कोमात गेल्या आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रकृती साथ देत नसतानाही दीक्षित सातत्याने काम करताना दिसत असत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी चिंताही व्यक्त केली गेली होती. मध्यंतरी हृदय शस्त्रक्रियेसाठी त्या फ्रान्सलाही गेल्या होत्या. त्यांच्यावर २०१२ मध्ये अ‍ॅन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. प्रकृती अस्वास्थ्य असतानाही त्या अखेपर्यंत राजकारणात सक्रिय होत्या. त्या दिल्ली मुख्यमंत्रिपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार मानल्या जात होत्या. या वर्षी जानेवारीमध्ये त्यांच्याकडे राहुल गांधी यांनी पुन्हा दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद दिले होते. दोन दिवसांपूर्वीच दीक्षित यांनी आपल्या अखत्यारीत दिल्लीतील ब्लॉक स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यावरून दिल्ली काँग्रेसमध्ये वादालाही तोंड फुटले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून दीक्षित यांचा पराभव झाला होता. भाजपचे दिल्लीप्रमुख मनोज तिवारी यांनी त्यांना पराभूत केले होते.

दिल्लीवर निरातिशय प्रेम करणाऱ्या शीला दीक्षित १९९८ ते २०१३ अशी सलग पंधरा वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. राजधानीच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. दिल्लीत मोठय़ा प्रमाणावर पायाभूत प्रकल्प त्यांच्या कार्यकाळातच राबवण्यात आले. त्यांच्याच काळात ८७ फ्लायओव्हर बांधण्यात आले. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक ‘सीएनजी’वर आणली गेली. दिल्लीकरांची प्रवासवाहिनी मानली जाणाऱ्या मेट्रो रेल्वेचे काम दीक्षित यांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात सुरू झाले; पण १५ वर्षांत बदललेल्या दिल्लीकरांच्या मानसिकतेचा त्यांना अंदाज न आल्याने चौथ्या वेळी मात्र अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षितांच्या दिल्ली काँग्रेसचा दारुण पराभव केला. केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान दीक्षित यांच्यावर प्रखर टीका केली होती. दीक्षित यांनी ही टीका वैयक्तिक अपमान समजून मनाला लावून घेतली होती. त्यामुळे केजरीवाल यांच्याबद्दल त्यांच्या मनात शेवटपर्यंत अढी होती. लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाशी काँग्रेसने आघाडी करण्यास दीक्षित यांनी कडाडून विरोध केला होता.

शीला दीक्षित यांचा जन्म पंजाबमधील कपूरथळा येथील असला तरी दिल्ली ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले. प्रशासकीय अधिकारी असलेल्या विनोद दीक्षित यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. इंदिरा गांधी यांच्या काळात मंत्रिपद भूषणवणारे उमाशंकर दीक्षित हे त्यांचे सासरे; पण शीला दीक्षित यांना राजकारणात आणले ते इंदिरा गांधी यांनी. १९८४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महिलांविषयक आयोगाकडे पाठवलेल्या भारताच्या प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. त्याच वर्षी त्या उत्तर प्रदेशमधील कन्नोज मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर राजीव गांधी मंत्रिमंडळात त्या संसदीय कामकाज राज्यमंत्री बनल्या.

दीक्षित यांचे गांधी कुटुंबाशी निकटचे संबंध होते. त्यामुळेच त्यांना २०१४ मध्ये केरळचे राज्यपाल करण्यात आले. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेशमधील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले होते. भाजपला टक्कर देण्यासाठी ब्राह्मण चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता; परंतु काँग्रेसच्या या भूमिकेवर टीका झाली आणि काँग्रेसने समाजवादी पक्षाशी युती केल्यामुळे दीक्षित यांचे नाव मागे घेण्यात आले होते.

शीला दीक्षित यांच्या निधनाने मी कोसळलो आहे. त्या काँग्रेसच्या प्रिय कन्या होत्या.     – राहुल गांधी, काँग्रेसचे नेते  

शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या विकासासाठी केलेली कामगिरी लक्षणीय आहे.      नरेंद्र मोदी, पंतप्रधान