भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांच्या उपस्थितीत त्यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन भाजपबरोबरच शिरोमणी अकाली दलावर त्यांनी टीकास्त्र सोडले. शिरोमणी अकाली दलाने पंजाबला कुठं-कुठं विकलं आहे, याचा भंडाफोड करणार असल्याचा दावा त्यांनी केली. सिद्धूंच्या या टीकेला शिरोमणी अकाली दलानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. हे दल बदलू आहेत, जे सौदे करतात. यांना जनता ओळखत नाही का?, असा सवाल अकाली दलाचे प्रमुख व मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केला आहे. हे स्थलांतरित करणारे पक्षी आहेत. ते कोणासाठी काम करतात हे जनतेला चांगलेच ठाऊक असल्याचेही ते म्हणाले.

दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत नवज्योतसिंग सिद्धू यांनी अनेक गंभीर आरोप केले. अकाली दल ही आता खासगी संपत्ती झाली असल्याचे त्यांनी म्हटले. यावर अकाली दलाचे विक्रमसिंग मजेठिया यांनीही निशाणा साधला. सिद्धू यांनी बोललेली प्रत्येक बाब गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. भाजपमध्ये असताना सिद्धू यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्ये जनता विसरली आहे काय? माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल त्यांनी सर्वाधिक मानहानीकारक वक्तव्ये केले असल्याचे माध्यमांना सांगितले.
काही महिन्यांपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. तेव्हापासून सिद्धू हे आम आदमी पक्ष, काँग्रेस या पक्षांमध्ये चाचपणी करत होते. अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपमध्ये जाण्यासाठी त्यांनी एक-दोन वेळा अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. परंतु, त्यांची बोलणी यशस्वी झाली नसल्याचे बोलले जाते. त्यानंतर सिद्धू यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये असतानाही सिद्धू यांचे शिरोमणी अकाली दलाशी कधी पटले नाही. त्याचबरोबर भाजपमधील काही नेत्यांबरोबर त्यांचे मतभेद होते, असे सांगण्यात येते. अखेर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू यांनी भाजपला रामराम ठोकला होता.