नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना असून, पंजाब-हरयाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी भारत बंदची हाक दिली होती. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलानंही पाठिंबा दिला असून, पक्षाचे नेते कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी अमेरिकेनं जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बचं उदाहरण देत मोदी सरकार हादरलं असल्याचा दावा केला.

कृषी विधेयकांवरून देशभरात संतप्त पडसाद उमटत आहे. शुक्रवारी देशभरात भारत बंद आंदोलन करण्यात आलं. ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. पंजाब, हरयाणात मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे दिसले. यात पंजाबमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं आंदोलनात सहभाग घेत कृषी विधेयकांना विरोध दर्शवला.

यावेळी बोलताना अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी भूमिका मांडली. बादल म्हणाले,”दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेनं जपानला अणुबॉम्ब टाकून मोठा हादरा दिला होता. त्याचप्रमाणे अकाली दलाच्या एका बॉम्बने (हरसिमरत कौर यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानं) मोदी सरकारला हादरवून टाकलं आहे,” असा दावा सुखबीर सिंह बादल यांनी केला.

शिरोमणी अकाली दल भाजपाप्रणित एनडीएतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. भाजपाचा मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलानं कृषी विधेयकांना विरोध केला आहे. या विधेयकांना विरोध म्हणून पक्षाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

समजून घ्या… केंद्रीय मंत्रिमंडळातून का बाहेर पडला अकाली दल?

पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या बाजूनं भूमिका घेतल्यानंतर शिरोमणी अकाली दलानं अचानक कृषी विधेयकं संसदेत मांडण्याच्या काही वेळेआधी मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ही विधेयकं शेतकरी विरोधी असून, आपण शेतकरी व त्यांच्या मुलामुलींच्या समर्थनार्थ राजीनामा दिल्याचं हरसिमरत कौर बादल यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं.