“कंगनाचं कार्यालय हे बेकायदेशीर होतं. तिचं बेकायदेशीर बांधकाम तोडलं म्हणून सध्या कांगावा सुरू आहे. कंगनाच्या ऑफिस तोडफोड प्रकरणात मला प्रतिवादी केलं जाणं हे हास्यास्पद आहे. सध्या मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं सुनियोजित षडयंत्र रचलं जातंय,” असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर त्यांनी भाष्य केलं असून ते अपेक्षितच असल्याचं म्हटलं. त्यांनी एबीपी माझा या वाहिनीशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी अनेक प्रकरणांवर भाष्य केलं.

आणखी वाचा- ड्रग्ज प्रकरणात आता फक्त ट्रम्प यांचं नाव येणं बाकी : संजय राऊत

“बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणुकासाठीच राजीनामा दिला आहे. हे सर्वांनाच अपेक्षित होतं. ही त्यांची राजीनामा देण्याची पहिली वेळ नाहीये. जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जातायत,” असं राऊत यावेळी म्हणाले. “आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली घडलो आहोत. माझ्या नावावर शेकडो केसेस आहे. आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. आम्हाला न्यायालयाची लढाई नवी नाही,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार; कोर्टातली लढाई मला नवीन नाही – संजय राऊत

पांडे राजकारणात उतरण्याची शक्यता

पांडे स्वेच्छानिवृत्ती घेतील अशी चर्चा बिहारमध्ये मागील बऱ्याच काळापासून सुरु होती. मात्र आता पांडे बक्सर विधानसभेच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (रालोआ-एनडीए) पांडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पांडे यांनी २००९ सालीही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पांडे हे बिहारमधील १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुशांत प्रकरणामध्ये अनेक वेळा थेट मुंबई पोलिसांच्या तपासावर पांडे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते चांगलेच चर्चेत होते.