भारतातील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीवर टीका करणारा अहवाल अमेरिकेने सादर केला. शुक्रवारीच अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने यासंदर्भातला अहवाल प्रसिद्ध केला. केंद्रातील मोदी सरकार व भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मुस्लिमांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. आता शिवसेनेनेही सामनातून अमेरिकेवर टीकेचे बाण चालवले आहेत. हिंदू संघटनांनी मुस्लिमांवर हल्ले केले असा साक्षात्कार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला झाला. मात्र भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसून चोंबडेपणा करायची गरज नाही असं शिवसेनेने म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

भारतात धर्माच्या नावे हिंसाचार वाढला आहे. हिंदू संघटनांनी अल्पसंख्याक आणि मुस्लिमांवर हल्ले केले आहेत असा ‘शोध’ अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने लावला आहे. शिवाय हे हल्ले रोखण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचे तुणतुणेही वाजवले आहे. अमेरिकेत सरकार कोणाचेही असो पण ते जगाचे स्वयंघोषित कैवारी असतात. आपण एकमेव जागतिक महासत्ता आहोत आणि संपूर्ण जगाला शहाणपणा शिकवण्याचा मक्ता फक्त आपलाच आहे असाच अमेरिकेन सत्ताधाऱ्यांचा खाक्या असतो. त्याचमुळे भारतातील अल्पसंख्याक आणि मुस्लीम सुरक्षेचा कळवळा ट्रम्प सरकारच्या परराष्ट्र खात्याला आला आहे.

याआधीदेखील गोमांस बाळगल्याच्या संशयावरून आपल्या देशात जे काही मृत्यू झाले त्यावरून अमेरिकेने मगरीचे अश्रू ढाळले होते आणि भारत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आताही धर्म आणि गोरक्षा याच कारणांवरून हिंदू संघटनांचे मुस्लिम तसेच अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले वाढले आहेत असे ‘इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडम इंडिया 2018’ या नावाने अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणे हा तर अमेरिकन सरकारांचा जुनाच खेळ आहे. अगदी बराक ओबामांसारखा ‘उदारमतवादी’ वगैरे राष्ट्राध्यक्ष असतानाही अमेरिकेचे हे धोरण बदललेले नव्हतेच. आताचे अध्यक्ष ट्रम्प हेदेखील त्याच वाटेने चालले आहेत. अगदी आताच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख डॅन कोट्स यांनी प्रचार काळात भारतात धार्मिक हिंसाचार आणि जातीय दंगली उसळू शकतात अशी ‘भविष्यवाणी’ केली होती.

मुळात भारताच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खुपसण्याचा अधिकार अमेरिकेला दिला कोणी? भारताने हा आरोप तडकाफडकी फेटाळून अमेरिकेचा चोंबडेपणा चालू दिला नाही हे बरेच झाले. अमेरिकेने निदान आता तरी भारताबाबत ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’बनण्याचे उद्योग सोडून द्यावेत