मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला शिवसेनेचा कडवा विरोध होता. ‘घरात ना तेल ना पीठ, कशाला हवे विद्यापीठ’ ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्या काळातील घोषणा चांगलीच गाजली होती. त्यामुळे आजही दलितांच्या मनात शिवसेनेविषयी अढी आहे. अनारक्षित सातारा लोकसभा मतदारसंघातून आरपीआयचा उमेदवार शिवसेनेच्या सहकार्याने निवडून आला किंवा पराभूत झाला तरी शिवसेनेला मात्र दलितविरोधी भू्मिका पुसण्याची नामी संधी मिळेल.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करणाऱ्या शिवसेनेने दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ आरक्षित नाही. मात्र स्थानिक नेतृत्व प्रबळ असल्याने शिवसेनेसाठी हा मतदारसंघ अडचणीचा आहे. त्यामुळे ‘दलितांचा पक्ष’ अशी ओळख असलेल्या आरपीआयला साताऱ्याची जागा दिल्यास दलित मतदारांच्या मनात शिवसेनेविषयी असलेली अढी दूर होईल, अशी चर्चा शिवसेनेत आहे. आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मागणी केलेल्या लातूर व वर्धा मतदारसंघाच्या मागणीचा चेंडू शिवसेनेने भारतीय जनता पक्षाकडे टोलविला आहे.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व रामदास आठवले यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत सातारा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. ते म्हणाले की, आरपीआय महायुतीतील महत्त्वाचा पक्ष आहे. त्यामुळे केवळ मतदारसंघ आरपीआयसाठी सोडून चालणार नाही तर त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेची असेल. लातूर व वर्धा लोकसभा मतदारसंघ आरपीआयसाठी सोडण्याची विनंती आठवले यांनी केली आहे. मात्र दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाटय़ाचे असल्याने शिवसेना त्यासबंधी कोणतेही आश्वासन देणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. या संदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रामदास आठवले यांना समाधान वाटेल असेच मतदारसंघ आरपीआयला दिले जातील. लातूर व वर्धा या दोन्ही मतदारसंघाची मागणी आठवले यांच्याकडून करण्यात आली असली तरी अंतिम निर्णय भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे व आठवले यांच्या बैठकीत घेतला जाईल.