खासदार गायकवाड यांच्यावरील हवाईबंदीप्रकरणी शिवसेनेचा संसदेत गदारोळ घालण्याचा सज्जड इशारा

नरेंद्र मोदी सरकारमध्ये आहोत म्हणून शांत आहोत. पण जवळपास दोन आठवडय़ानंतरही आमचे उस्मानाबादचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्याविरुद्धची अन्यायकारक हवाईप्रवासबंदी उठविली जात नसेल तर मग संसदेमध्ये गोंधळ घातल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा शिवसेनेने बुधवारी लोकसभेत दिला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर गायब झालेले गायकवाड अजूनही लोकसभेकडे फिरकलेले नाहीत. त्यांच्या ठावठिकाणाबद्दल उलटसुलट चर्चा आहेत.

एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी प्रवासबंदी लादली आहे. त्यामुळे तिकीट काढण्याचे गायकवाडांचे सात-आठ प्रयत्न विमान कंपन्यांनी हाणून पाडलेत.

लोकसभा सभापती सुमित्रा महाजन व केंद्रीय हवाई नागरी वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांच्याशी शिवसेना खासदारांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या होऊनही अद्यापि मार्ग निघालेला नाही. त्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी बुधवारी शून्य प्रहरामध्ये गायकवाडांचा मुद्दा उपस्थित केला.

कोणत्या कायद्याखाली प्रवासबंदी घातली, असा सवाल करून ते म्हणाले, ‘घटनेस दोन आठवडे झालेत. तोडगा निघण्याची आम्ही वाट पाहतोय. पण हवाई वाहतूक मंत्रालयाला निर्णय घ्यायला अद्याप वेळ मिळालेला नाही. मोदी सरकारमध्ये आहोत, म्हणून गप्प आहोत. शांत आहोत. पण त्यावर लवकर तोडगा शोधला नाही तर संसदेमध्ये गोंधळ घातल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला तसे करायला भाग पाडू नका. हवाईप्रवास हा गायकवाडांचा घटनात्मक हक्क आहे. एअर इंडियाच्या सेवेबद्दलच्या तक्रारींवर अद्याप काय कारवाई झाली,’ असा सवाल त्यांनी केला.