केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्राने हे कृषी कायदे रद्द करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हजारोंच्या संख्येने हे शेतकरी दिल्ली सीमेवर जमा झाले आहेत. भारतात कृषी कायद्यावरुन सुरु असलेल्या या आंदोलनावर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी टिप्पणी केली आहे. या आंदोलनाबद्दल भाष्य करणारे ते पहिले परदेशी नेते ठरले आहेत.

जस्टिन त्रुडोच्या या टिप्पणीचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. “जस्टिन त्रुडो तुमची अडचण आम्ही समजू शकतो, पण भारताचा अंतर्गत विषय हा दुसऱ्या कुठल्या देशाच्या राजकारणासाठी चारा नाही. त्यामुळे आम्ही ज्या प्रमाणे दुसऱ्या देशाच्या विषयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तसाच तुम्ही सुद्धा शिष्टाचाराचा आदर करा” असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. दुसऱ्या देशांनी यावर आपला सल्ला देण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी ही कोंडी फोडावी अशी विनंती प्रियंका चतुर्वेदींनी केली आहे.

त्रुडो नक्की काय म्हणाले?
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या मंत्रीमंडळामधील शीख नेत्यांशी संवाद साधताना त्रुडो यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुढे बोलताना त्यांनी भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. “भारतामधील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख न करणं चुकीचं ठरेल. भारतामध्ये सध्या सुरु असलेल्या या आंदोलनाची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. तिथे असणाऱ्या शीख समुदायातील व्यक्तींच्या नातेवाईकांबद्दल कॅनडात राहणाऱ्या अनेकांना चिंता वाटत असेल आणि ते सहाजिक आहे. मात्र मी तुम्हाला आठवण करुन देऊ इच्छितो की, अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याच्या हक्काचे आम्ही पाठीराखे आहोत. संवादातून प्रश्न सुटू शकतो यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या विषयाबद्दलची आमची चिंता आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी व्यक्त केली आहे. करोना आणि सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्याला एकत्र राहणं गरजेचं आहे,” असं त्रुडो यांनी म्हटलं आहे.