कर्नाटक येथील सिद्धगंगा मठाचे मठाधीश श्री शिवकुमार स्वामींचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली. शिवकुमार स्वामींनी सकाळी ११.४४ वाजता अखेरचा श्वास घेतल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. लिंगायत-वीरशैव समाजाचे शिवकुमार स्वामी हे १११ वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या (मंगळवार) दुपारी साडेचार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, शिवकुमार स्वामींच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

मुख्यमंत्र्यांशिवाय कर्नाटक भाजपाचे अध्यक्ष बी एस येडियुरप्पा, एम बी पाटील, के जे जॉर्ज आणि सदानंद गौडा हेही या यावेही उपस्थित होते. शिवकुमार स्वामींवर ८ डिसेंबर रोजी एक शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या फुफ्फसात संसर्ग झाला होता. तेव्हापासून ते आजारी होते.

नुकताच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर त्यांचे आज निधन झाले. शिवकुमार स्वामी यांचा जन्म १ एप्रिल १९०७ मध्ये रामनगर येथील वीरपुरा गावात झाला होता. सामाजिक कार्यातील योगदानासाठी वर्ष २०१५ त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देण्यात आला होता. तर २००७ मध्ये त्यांना कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९६५ मध्ये त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून साहित्यातून पीएच डी प्राप्त केली होती.

शिवकुमार स्वामी हे श्री सिद्धगंगा शैक्षणिक संस्थेचे प्रमुख होते. या संस्थेच्या राज्यभरात १२५ हून अधिक शाळा आहेत. मागील आठवड्यात येडियुरप्पा यांनी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.