शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांनी घातलेल्या प्रवासबंदीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी उठवली नाही तर मुंबईतून एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या शिवसेनेने आता सरकारलाच थेट इशारा दिला आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत या मुद्द्यावर तोडगा काढला नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) च्या बैठकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या नेत्यांना चुकीच्या पद्धतीने ‘टार्गेट’ केले जात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
बलात्कारी, दहशतवादी, इतकेच काय तर काश्मिरी फुटीरतावादीही विमानाने प्रवास करू शकतात; मग गायकवाड का नाही, असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्याचेही राऊत यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणामागे कोण आहे, हे लवकरच आम्ही जगासमोर आणू, असेही त्यांनी सांगितले. विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्या उद्योगपतीला या विमान कंपन्या ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देतात, असा हल्लाही त्यांनी यावेळी चढवला.
तत्पूर्वी, आज सकाळीच लोकसभेत रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान प्रवास बंदी घातल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदारांनी गदारोळ केला. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी बंदी घातल्याच्या प्रकरणात मोघम उत्तर देणाऱ्या नागरी हवाई उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्याविरोधात शिवसेनेने संताप व्यक्त केला होता. शिवसेना खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाजही काही वेळासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर खासदारांनी राजू यांना घेरावही घातला होता. यानंतर मध्यस्थी करत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घडामोडींनंतर राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि अशोक गजपती राजू यांच्यासोबत शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्यात रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एअर इंडियाने खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठवण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. त्यामुळे येत्या काळात रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदीचा मुद्दा अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 6:06 pm