भुंकणाऱ्या भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी एका घरात शिरलेल्या दलित तरुणाला चोर समजून बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे त्याला वीजेचा शॉकही देण्यात आला कहर म्हणजे यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवूनही देण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबांकी जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान, गंभीररित्या जखमी झालेल्या या दलित तरुणाने सोमवारी रुग्णालयात उपचार घेत असताना आपले प्राण सोडले.

सुजीतकुमार (वय २८) असे ग्रामस्थांच्या अमानूष छळाचा बळी ठरलेल्या दलित तरुणाचे नाव आहे. १८ जुलैच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. किरकोळ भांडणातून रागावून माहेरी गेलेल्या आपल्या पत्नीला घरी परत आणण्यासाठी तो निघाला होता. जेव्हा तो राघवपूर गावाजवळ पोहोचला तेव्हा रस्त्यात काही भटक्या कुत्री त्याच्या मागे लागली. त्यामुळे घाबरलेला सुजीतकुमार जवळच्याच एका घरात घुसला. त्याचवेळी सुजीतला चोर समजून घरातील लोकांनी पकडले.

सुरुवातीला या घरातील लोकांनी सुजीतकुमारला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला गावातील लोकांसमोर आणून वीजेचा करंट देण्यात आला. यानेही ग्रामस्थांचे समाधान झाले नाही त्यामुळे ते पेट्रोल घेऊन आले आणि ते सुजीतकुमारच्या अंगावर ओतून त्याला पेटवून दिले. दरम्यान, माराहण होत असल्याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गावातील लोकांपासून त्याला सोडवत एका स्थानिक रुग्णालयात दाखल केले. गंभीररित्या भाजल्याने डॉक्टरांनी त्याला लखनऊ येथील मोठ्या रुग्णालयात हालवण्याचा सल्ला दिला. मात्र, सोमवारी रुग्णालयात नेतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सुजीतकुमारची बहिण रेखाने सांगितले की, सुजीतने आपण चोर नसल्याचे ग्रामस्थांना वारंवार सांगितले इतकेच नव्हे, खात्री करण्यासाठी त्याने आपल्या कुटुंबियांचे फोन नंबरही त्यांना दिले. मात्र, तरीही लोकांनी त्याचे काहीही ऐकले नाही. माराहण करुन त्यांचे मन भरले नाही म्हणून शेवटी त्यांनी माझ्या भावाला पेटवून दिले.
सुजीतकुमार पेटिंगचे कामं करीत असे, मृत्यूनंतर आता त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. बाराबांकी पोलिसांनी याप्रकरणी पाच लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर आरोपींचा शोधही ते घेत आहेत.