दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या एका सामाजिक महिला कार्यकर्तीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. २६ वर्षीय महिला पश्चिम बंगालमधून आंदोलन सुरू असलेल्या टिकरी बॉर्डरकडे निघाली होती. मात्र, प्रवासादरम्यान तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ३० एप्रिल रोजी तिचा करोनाचा संसर्ग होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२६ वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होती. ११ एप्रिल रोजी दिल्लीतील टिकरी बॉर्डर येथे शेतकरी आंदोलन करणार होते. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ही महिला पश्चिम बंगालमधून दिल्लीकडे निघाली होती. यावेळी आरोपी पुरुष तिच्यासोबत प्रवासात होता.

या प्रकरणी संयुक्त किसान मोर्चानं निवेदन प्रसिद्ध केले आहे. आरोपीनं दिल्लीतील टिकरी बॉर्डरजवळ पोहोचल्यानंतर महिलेवर हल्ला केला आणि बलात्कार केला. या घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेला करोनाची लक्षणं दिसून आली. त्यानंतर पीडितेला करोना झाल्याचं निष्पन्न झालं. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला, असं संयुक्त किसान मोर्चानं म्हटलं आहे.

या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी बहादूरगढ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किसान सोशल आर्मी संघटना चालवणाऱ्या अनूप आणि अनिल मलिक या दोघांची नावं एफआयआरमध्ये असून, संयुक्त किसान मोर्चानं कठोर कारवाई केली आहे. किसान मोर्चानं टिकरी बॉर्डरवरील किसान सोशल आर्मीचे टेंट आणि बॅनर काढून टाकले आहेत.

“ही घटना जेव्हा किसान मोर्चाला कळाली, तेव्हा आम्ही कठोरात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांपूर्वीच समितीने तथाकथित किसान सोशल आर्मीचे टेंट आणि बॅनर्स काढून टाकले. आरोपींना सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे,” असं संयुक्त किसान मोर्चाच्या निवेदनात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून, हरयाणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रविवारी विशेष तपास पथक नियुक्त केलं आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपास करणार आहे.