कुलभषण जाधव यांना पाकिस्तान योग्य वागणूक देत नसल्यावरून प्रचंड टीका होत आहे. मात्र, पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना आतंकवादी घोषित केलं आहे त्यामुळे पाकिस्तानने त्यांच्याशी आतंकवाद्याप्रमाणेच व्यवहार करायला हवा असं धक्कादायक व वादग्रस्त विधान समाजवादी पार्टीचे नेते नरेश अगरवाल यांनी केलं आहे.

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं अटक केली तसेच भारतीय गुप्तहेर व दहशतवादी घोषित करून फाशीची शिक्षा जाहीर केली. परंतु भारतानं अत्यंत कडक भूमिका घेत जाधव यांच्यावर अन्याय झाल्याची भूमिका घेतली. जाधव हे भारतीय नौदलाच्या सेवेत होते, आणि आता ते निवृत्त झाले असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांचा कुठल्याही दहशतवादी कारवायांशी संबंध नसून जाधव यांच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयातही दाद मागितली आहे.

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना अखेर भेटू देण्याची मागणी पाकिस्ताननं मान्य केली आणि ती भेटही पार पडली. मात्र, पत्नीला मंगळसूत्र काढायला भाग पाडणं, जोडे परत न देणं, प्रत्यक्ष न भेटवता काचेपलीकडून ते ही शिपिंग कंटेनरमध्ये भेटवणं असे अमानवी प्रकार पाकिस्ताननं केले. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनाही कुलभूषण जाधव यांना भेटू दिले नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर टीकेची झोड उठली आहे. मात्र, समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेश अगरवाल यांनी मात्र पाकिस्तान आतंकवाद्यांशी वागावं तितकं कडक कुलभूषण यांच्याशी वागले तर काय चुकले असं बोलले असून यावरून वाद निर्माण होऊ शकतो.
भारतही आतंकवाद्यांशी कठोरपणे वागतो आणि तसंच वागायला हवं असंही ते म्हणाले. तसेच पाकिस्तानी तुरुंगात शेकडो भारतीय कैदी अडकले असताना फक्त कुलभूषण यादवच्याच बाबतीत का असं वागायचं असा प्रश्नही अगरवाल यांनी उपस्थित केला आहे.