श्रीनगर : दुकानदारांना दुकाने न उघडण्याचा इशारा देणारी पोस्टर्स काही ठिकाणी लावण्यात आल्यामुळे काश्मीरच्या बहुसंख्य भागांमध्ये गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी दुकाने आणि व्यापारी संकुले बंद ठेवण्यात आली होती आणि सार्वजनिक परिवहन सेवेच्या गाडय़ाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

काश्मीर खोऱ्यातील जनजीवन पूर्वपदावर आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली त्यापूर्वीच दुकाने बंद ठेवण्याचा इशारा देणारी पोस्टर्स लावण्यात आली होती.

श्रीनगर, गंडेरबल, अनंतनाग, कुलगाम, पुलवामा आणि शोपियन जिल्ह्य़ात त्याचप्रमाणे उत्तरेकडील काही भागांमध्ये बंद पाळण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही आठवडय़ांपासून दुकानदार सकाळी दुकाने उघडत होते, मात्र पोस्टर्स लावण्यात आल्यानंतर दुकाने सकाळीही उघडण्यात आली नाहीत.

सार्वजनिक परिवहन सेवेच्या गाडय़ा बंद असल्या तरी रिक्षा आणि आंतरजिल्हा टॅक्सी सेवा काही प्रमाणात सुरू होती. प्रीपेड भ्रमणध्वनी आणि सर्व इंटरनेट सेवा ५ ऑगस्टपासूनच बंद आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.