चेन्नईतील पूरस्थितीमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले असतानाच पुराचे पाणी रुग्णालयात शिरून वीजपुरवठा बंद पडल्याने १८ रुग्णांना प्राणवायूअभावी मृत्यूमुखी पडावे लागल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चेन्नईत अतिपावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अडय़ार नदीच्या काठावर असलेल्या मनपक्कनम भागातील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालय परिसरात पाणी शिरले. वीजपुरवठा खंडीत झाल्याने रुग्णालयाचे कामकाज जनरेटरवर सुरू होते. मात्र, पुराचे पाणी जनरेटर कक्षात शिरल्याने पर्यायी वीजपुरवठाही खंडीत झाला. त्यामुळे १८ रुग्णांचा प्राणवायूअभावी तडफडून मृत्यू झाला.
पावसाची उघडीप
दरम्यान, पावसाने आता चेन्नईत उघडीप दिली असून, पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. पाणी झपाटय़ाने ओसरत असून मदतकार्य सोपे होत आहे. पावसाने मोबाइल सेवा कोलमडली होती, ती काही प्रमाणात सुधारली आहे. एटीएम व इतर सेवा बंद आहेत. पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या २६९ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती दलाची आणखी २० पथके पाठवण्यात आली असून, दहा हजार जणांना वाचवण्यात आले आहे.

जनरेटर कक्षात पाणी शिरल्याने व्हेंटिलेटर तसेच प्राणवायूचा पुरवठा करणारे सिलिंडर यांसारख्या जीवरक्षक साधनांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना विजेचा सतत ‘बॅकअप’ मिळू शकला नाही, असे मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले.

रुग्णांचा मृत्यू वीजपुरवठा बंद पडल्यामुळे झाला, असा घाईचा निष्कर्ष काढू नये. सरकार या प्रकरणाचा तपास करत आहे.
– जे. राधाकृष्णन,
तामिळनाडूचे आरोग्य सचिव