पाक व्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन पुन्हा एकदा राजकीय आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. तत्कालीन संरक्षणमंत्री आणि सध्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी यावरुन राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. विरोधकांकडून सर्जिकल स्ट्राईकवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नचिन्हाला उत्तर देताना राहुल गांधींना सोबत घेऊनच सर्जिकल स्ट्राईक करायला हवे होते का? असा सवालच सोमवारी एका कार्यक्रमात विचारत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला.


पर्रिकर म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक केले नव्हते असे विरोधकांना का वाटत आहे. त्यांची नकारत्मकात पहा, यासाठी मला तुम्हाला तिकडे घेऊन जायला हवे होते का? राहुल गांधींना सोबत घेऊन जा आणि सर्जिकल स्ट्राईक करा असे मी लष्कराला सांगायला हवे होते का? अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

सर्जिकल स्ट्राईकसाठी सर्वांत महत्वाची गोष्ट असते ती मोहिम गुप्त ठेवणे. त्यामुळे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री या नात्याने मी स्वत:, लष्करप्रमुख आणि डीजीएमओ यांनाच केवळ या मोहिमेची माहिती होती. तसेच या मोहिमेत कोअर कमांडर, आर्मी कमांडर आणि प्रत्यक्ष हल्ला करणारे जवान यांनाच याची माहिती होती.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सेनेने पीओकेमध्ये यशस्वी सैनिकी कारवाई केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या या मोहिमेची माहिती दिली होती. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान एकाही भारतीय सैनिकाला इजाही झाली नव्हती. दहशतवाद्यांचे चार कॅम्प उद्धवस्त करीत भारतीय सैनिक पुन्हा भारतीय हद्दीत परतले होते.