अयोध्येत राममंदिराच्या बांधकामात काँग्रेस हा सर्वात मोठा अडथळा असल्याचा आरोप उत्तरप्रदेशचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनी केला असून, ‘मते गोळा करण्यासाठी’ देशभरातील धार्मिक ठिकाणांना भेटी देण्याऐवजी राममंदिराच्या मुद्दय़ावर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना केले.

काँग्रेसचे कार्यकर्ते राममंदिर व रामसेतू यांना विरोध करत असून गोहत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे, असाही आरोप राज्याचे ऊर्जामंत्री असलेले शर्मा यांनी केला.

भाजप या मुद्दय़ावर कायदा का करत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राममंदिराच्या बांधकामात काँग्रेस हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे शर्मा म्हणाले. देशभरातील मंदिरांना भेटी देण्याचा काँग्रेस अध्यक्षांचा उपक्रम एकतर मते गोळा करण्यासाठी आहे, किंवा त्यांनी अयोध्येत राममंदिराच्या उभारणीला पाठिंबा द्यायला हवा. त्यांच्या पक्षाने या मुद्दय़ावर भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मंदिराचे बांधकाम होण्यासाठी रा.स्व. संघ आणि त्याच्या परिवारातील संघटना आंदोलनाची भूमिका घेत आहेत याकडे लक्ष वेधले असता, या संघटनांची भूमिका भाजपसारखीच असल्याचे ते म्हणाले. हा मुद्दा घटनेच्या चौकटीत सोडवला जाईल असे भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.