करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र होते. यातचं देशात करोना साथीची तिसरी लाट अटळ असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सिंगापूर येथून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. सिंगापूर येथे आढळून आलेल्या करोनाच्या नविन विषाणूबद्दल केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे. हा विषाणू लहान मुलांसाठी धोकादायक असून यामुळे भारतात करोनाची तिसरी लाट येऊ शकते असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत प्रामुख्याने काम करण्याची मागणी केली आहे. “सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोनाचा नविन विषाणू लहान मुलांसाठी धोकादायक मानला जात आहे. भारतात हा तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो. केंद्र सरकारकडे माझी विनंती आहे. १. सिंगापूरसोबत विमान सेवा तात्काळ बंद करावी २. लहान मुलांच्या लसीकरणासाठीसुद्धा प्रामुख्याने काम करण्यात यावं,” असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

करोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच केजरीवाल यांनी लहान मुलांच्या देखील लसीकरणासाठी काम करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, दुसऱ्या लाटेतच लहान मुलांना करोनाची लागण होत असल्याची प्रकार कर्नाटकात समोर आले आहेत. कर्नाटकात लहान मुलांमध्ये करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेआधीच भीती वाढली आहे. कर्नाटकमध्ये मागच्या १५ दिवसात १९ हजाराहून अधिक मुलांना करोनाची लागण झाली आहे. तर दिल्लीत दोन मुलांचा करोनाने बळी घेतला आहे. मागच्या १५ दिवसात जवळपास १९ हजार मुलांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.