भाजपा सत्तेत आल्यापासून मुस्लिम आणि दलितांविरोधात जाणीवपूर्वक विष पसरवले जाते आहे असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला. उत्तर प्रदेशातील जोडप्याला पासपोर्ट देण्याआधी धर्म बदलण्यास सांगण्यात आले. त्या प्रकरणी ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तन्वी सेठ या महिलेने मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्याने आपला अपमान करण्यात आला असा आरोप केला आहे. मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ या दोघांचाही पासपोर्ट ऑफिसमध्ये अपमान करण्यात आला आहे असाही आरोप ओवेसी यांनी केला.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांनी आरोप केला आहे की, पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी विकास मिश्रा याने मोहम्मद अनस सिद्दीकी यांना धर्मांतर करण्यास सांगितलं. इतकंच नाही तर तन्वी यांना सर्व कागदपत्रांवर आपलं नाव बदलण्यासही सांगितलं. जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्याने त्यांच्यावर आरडाओरड सुरु केली. ‘तन्वी आणि मी १९ जून रोजी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. लखनऊमधील पासपोर्ट सेवा केंद्रात बुधवारी आम्हाला बोलावलं होतं. पहिले दोन टप्पे पार केल्यानंतर औपचारिकता पुर्ण करण्यासाठी आम्हाला सी काऊंटवर पाठवण्यात आलं’, अशी माहिती अनस यांनी दिली आहे. या जोडप्याने सुषमा स्वराज यांच्याकडे दाद मागितली. सुषमा स्वराज यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यावर त्यांना पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान या बातमीनंतरच संतप्त प्रतिक्रिया देत ओवेसी यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मुस्लिम आणि दलितांविरोधात समाजात विष पसरवले जाते आहे असे म्हटले आहे. पासपोर्ट देताना या लोकांना धर्म महत्त्वाचा वाटतो? लखनऊच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये लग्न झालेल्या जोडप्याचा पासपोर्ट देताना धर्म मधे आणून छळ केला गेला असा आरोपही ओवेसी यांनी केला.