पाकिस्तानात सध्या मोठया प्रमाणावर अस्वस्थतता आहे. इम्रान खान सरकार विरोधात तिथले विरोधी पक्ष एकवटले आहेत. सरकार विरोधात फक्त विरोधी पक्षचं आंदोलन करत नाहीय, तर सिंध प्रांतातील पोलीस अधिकाऱ्यांनी शक्तीशाली पाकिस्तानी लष्कराविरोधात खुलेआम बंड पुकारले आहे.

अलीकडेच पाकिस्तान लोकशाही चळवळ या नावाखाली एकटवलेल्या पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकार विरोधात मोठे आंदोलन केले. कराचीमध्ये झालेल्या सभेला हजारो लोक जमले होते, यावेळी इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पाकिस्तानाल इम्रान खान सरकारला इलेक्टेड नाही, तर सिलेक्टेड सरकार म्हणतात. पाकिस्तानी लष्कराने त्यांना सत्तेवर बसवल्याचा आरोप केला जातो.

कराचीतील सभेनंतर पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नेत्या मरियम नवाज यांचे पती सफदर अवान यांना हॉटेलमधल्या खोलीतून अटक करण्यात आली. पाकिस्तान मुस्लिम लीग हा नवाझ शरीफ यांचा पक्ष आहे. पीएमएल-एन चे नेते सफदर अवान यांच्या अटक नाटयामध्ये सिंधचे आयजीपी मुश्ताक महार यांना अपमानित करण्यात आले. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अशा प्रकारे अपमानित करण्यात आल्याने, चिडलेल्या सिंध प्रातांच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी एकाचवेळी सुट्टीसाठी अर्ज केला. द न्यूज इंटरनॅशनलने हे वृत्त दिले आहे.

रेंजर्सनी सिंधच्या आयजीपींचे अपहरण केले व सफदर विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला, असा आरोप पीएलएल-एन पक्षाच्या प्रवक्त्याने केला आहे. या प्रकाराची सिंधच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यांनी एकत्रित रजेसाठी अर्ज केला. या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानी लष्कराचे नाव खराब होत असल्याने लष्कर प्रमुख बाजवा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.