दिल्लीमधील एका कार्यक्रमात डॉक्टरच्या श्रीमुखात लगावल्याप्रकरणी बॉलीवूडमधील पार्श्वगायक मिका सिंगला गुरूवारी नवी दिल्ली येथे अटक करण्यात आली. एप्रिल महिन्यात दिल्लीमध्ये डॉक्टरांच्या संघटनेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिल्लीतील इंदापुरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच मिका सिंगविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमात मिकाने आक्षेपार्ह वर्तन केल्यावरून डॉ. श्रीकांत यांच्या कानाखाली लगावली होती. या कार्यक्रमात मिका सिंग व्यासपीठावर उभे राहून गाणी सादर करत होता. यादरम्यान, मिकाने दिल्लीतील लोकांची, डॉक्टर्सची तोंडभरून स्तुतीही केली. मात्र, गाण्यांचा हा कार्यक्रम रंगत गेला तशी व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे मिकाने पुरूषांना व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना तर महिलांना व्यासपीठाच्या मध्यभागी राहून नाचायची विनंती केली.
कार्यक्रमाच्या शेवटी जवळपास सर्व डॉक्टर्स जेवण्याच्या स्टॉलवर गेले होते. तेव्हा अचानकपणे संगीत वाजायचे बंद झाले आणि मिकाने त्याच्या बाऊन्सर्सना प्रेक्षकांमधील एका डॉक्टरला पकडून आणायला सांगितले. या डॉक्टरला स्टेजवर आणल्यानंतर मिकाने सर्वांदेखत त्याच्या श्रीमुखात लगावली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे थोड्यावेळासाठी सगळे जण अचंब्यात पडले. मात्र, संबंधित डॉक्टर महिलांमध्ये नाचत होता आणि अश्लील हावभाव करत होता, त्यामुळे आपण त्याला मारल्याचे मिकाचे म्हणणे होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर याठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर्स आणि मिका सिंग यांच्यात चांगलीच जुंपली होती. अखेर पोलीसांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण मिटविण्यात आले.