मागील काही दिवसांपासून भारतामधील करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात ५४ हजार ३६६ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ६९० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७७ लाख ६१ हजार ३१२ इतकी झाली आहे. यापैकी एक लाख १७ हजार ३०६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबळींच्या रोजच्या संख्येतही उत्तरोत्तर घट नोंदविण्यात येत आहे. काल दिवसभरात करोनामुळे ६९० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचे हे प्रमाण १.५१ टक्के आहे.

आतापर्यंत ६९ लाख ४८ हजार ४९७ जणांनी करोनावर मात केली आहे. करोनामुक्तांचे प्रमाण ८९ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात सध्या सहा लाख ९५ हजार ५०९ जणांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत ७३ हजार ९७९ जणांनी करोनावर मात केली आहे.