देशात वाढत असलेल्या दंगलींबद्दल चिंता व्यक्त करून समाजात फूट पाडण्याच्या उद्देशानेच काही दुष्ट प्रवृत्तींकडून दंगली भडकवण्यात येतात, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोमवारी सांगितले. राष्ट्रीय एकात्मता परिषदेमध्ये आपले विचार मांडताना शिंदे यांनी समाजातील दुष्ट प्रवृत्तींवर कडाडून प्रहार केला.
ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत देशामध्ये जातीय आणि धार्मिक दंगलींची संख्या वाढली असल्याचे आकडेवारीवरून दिसते. अतिशय़ छोट्या घटनांमधून मोठी दंगल भडकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक कुटुंबांना घरापासून विस्थापित व्हावे लागते. काही दुष्ट प्रवृत्तींकडून समाजाची दोन गटांत विभागणी करण्यासाठीच दंगल भडकवण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.
समाजामध्ये फूट पाडण्यासाठी खूप छोटे गट कार्यरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे आले पाहिजे, अशीही अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.