काश्मीर खोऱ्यात परिस्थिती खूप वाईट आहे असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर गुलाम नबी आझाद प्रथमच सहा दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. मला प्रसारमाध्यमांना आता काही सांगायचे नाही. मी चार दिवस काश्मीरमध्ये राहिलो आता दोन दिवसांसाठी जम्मूमध्ये आलो आहे. सहा दिवसांचा दौरा संपल्यानंतर मला जे काही सांगायचे आहे त्याबद्दल तुमच्याशी बोलेन असे आझाद म्हणाले.

जम्मू-काश्मीर हे गुलाम नबी आझाद यांचे गृहराज्य आहे. यापूर्वी तीन वेळा त्यांनी काश्मीरला जाण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासनाने विमानतळावरुनच त्यांना माघारी पाठवून दिले. १६ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने आझाद यांना श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला आणि जम्मूमधील जिल्ह्यांचा दौरा करण्याची परवानगी दिली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आझाद काश्मीर खोऱ्यातील जनतेसोबत संवाद साधण्यासाठी पूर्णपणे मुक्त आहेत हे स्पष्ट केले.

काश्मीर खोऱ्यात मी ज्या ठिकाणी जायचे ठरवले होते त्यातल्या १० टक्के ठिकाणांनाही मी भेट देऊ शकलो नाही प्रशासनाने मला त्यासाठी परवानगी दिली नाही असे आझाद म्हणाले. जम्मू-काश्मीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेही दिसले नाही असे आझाद यांनी सांगितले.