चीनची खुमखुमी कायम : पूर्व लडाखमध्ये गोळीबार; भाल्यांसह अन्य शस्त्रांद्वारे चिथावणीचा प्रयत्न

पूर्व लडाखमध्ये चीनच्या कुरापती सुरूच आहेत. रेझांग-ला येथील मुखपरीजवळ भाले, लोखंडी शिगा आणि अन्य शस्त्रे हाती घेतलेल्या चिनी सैन्याने सोमवारी भारतीय जवानांना चिथावणी दिली. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ गोळीबारही केला. भारताचा भूभाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न भारतीय जवानांनी पुन्हा हाणून पाडला असून, चीनच्या खुमखुमीमुळे प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थिती स्फोटक बनली आहे.

पूर्व लडाखमध्ये सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ५० ते ६० सशस्त्र चिनी सैनिक प्रत्यक्ष ताबारेषेजवळ भारतीय लष्कराच्या चौक्यांच्या जवळ आले होते. त्यांनी भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र,  जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याने माघार घेतली. मात्र, माघारी फिरताना चिनी सैन्याने गोळीबाराच्या १० ते १५ फैरी हवेत झाडल्या, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

भारतानेच प्रत्यक्ष ताबारेषेचे उल्लंघन करून गोळीबार केल्याचा दावा चीनने सोमवारी रात्री केला होता. तो फेटाळून मंगळवारी भारतीय लष्कराने चीनचा कांगावा उघड केला. ‘‘भारतीय जवानांनी प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडलेली नाही. तसेच कुठलीही आक्रमक कृती किंवा गोळीबार केलेला नाही. पँगाँग सरोवर परिसरातील संरक्षणदृष्टय़ा महत्त्वाच्या ठिकाणांवर भारतीय जवान तैनात आहेत. चिनी सैन्याने गोळीबार करून भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला,’’ असे भारतीय लष्कराने निवेदनात म्हटले आहे. चीनच्या चिथावणीनंतरही भारतीय जवानांनी संयम बाळगत परिपक्वतेचे दर्शन घडविले, असेही लष्कराच्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

चीनने अनेकदा सीमा करारांचे उल्लंघन करून चिथावणीजनक वर्तन केले आहे. सीमेवरील हालचालींबाबत चिनी लष्कराचे निवेदन दिशाभूल करणारे आहे, असेही भारतीय लष्कराने स्पष्ट केले.

याआधी चिनी सैन्याने पँगाँग सरोवराजवळ २९ आणि ३० ऑगस्टदरम्यान चिथावणीजनक कारवाया केल्या होत्या. त्याआधी १५ जूनला चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात केलेल्या हिंसाचारात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यात चीनचीही मनुष्यहानी झाली. मात्र, ती किती होती, याबाबत चीनने अधिकृत माहिती देणे टाळले.

चर्चा सुरू असतानाही..

सीमेवरील तणाव निवळण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात लष्करी, राजनैतिक आणि राजकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. गेल्या शुक्रवारी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे समपदस्थ जनरल वेई फेंग यांची मॉस्कोमध्ये भेट झाली होती. ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या परिषदेदरम्यान झालेल्या चर्चेत या दोघांनी तणाव निवळण्याची गरज व्यक्त केली होती. त्याआधी गलवान खोऱ्यातील हिंसाचार आणि पँगाँग सरोवर येथील २९-३० ऑगस्टदरम्यानच्या चीनच्या लष्करी कारवायांनंतरही उभय देशांदरम्यान लष्करी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून फारसे काही हाती लागलेले नसल्याचे चित्र आहे.

४५ वर्षांनंतर गोळीबार

चीनच्या सैन्याने सोमवारी पूर्व लडाखमधील मुखपरी भागात ताबारेषेजवळ भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. ताबारेषा ओलांडल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा भारतीय जवानांनी त्यांना दिला. काही वेळाने चिनी सैन्य माघारी परतले. मात्र, जाता-जाता एका चिनी सैनिकाने हवेत गोळीबार केला. प्रत्यक्ष ताबारेषेवरील गेल्या ४५ वर्षांतील हा पहिला गोळीबार असल्याचे मानले जाते. याआधी अरुणाचल प्रदेशमध्ये तुलुंग ला येथे १९७५ मध्ये चिनी सैन्याने आसाम रायफल्सच्या पथकावर हल्ला केला होता.