केरळ आणि शेजारच्या राज्यांमध्ये (२०१६) दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आयसिसच्या सहा दहशतवाद्यांना सोमवारी येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

दोषी ठरविण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे मनसीद मेहमूद, स्वालीह मोहम्मद, रशीद अली, रमशाद, सफवान आणि मोइनुद्दीन अशी आहेत. विशेष न्यायाधीश पी. कृष्णकुमार यांनी जस्मीन एन. के. याला निर्दोष ठरविले.

बेकायदेशीर कारवाया प्रतिंबधक कायद्यान्वये या आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून त्यामध्ये दहशतवादी संघटनेचे सदस्यत्व आणि दहशतवादी संघटनेला सहकार्य करण्याच्या आरोपांचाही समावेश आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये कन्नूर जिल्ह्य़ातील कनकमला येथे एनआयएने आयसिसचा गट उद्ध्वस्त केला. न्यायाधीश, पोलीस अधिकारी, राजकीय नेते, परदेशी पर्यटक आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ले करण्याची योजना आखत असताना हा गट उद्ध्वस्त करण्यात आला होता.

दिल्ली मध्ये स्फोटकांसह तिघांना अटक

नवी दिल्ली : आसाममधील तीन जणांना आयईडीसह अटक करून दिल्लीतील संभाव्य दहशतवादी हल्ला टाळल्याचे दिल्ली पोलिसांनी सोमवारी येथे सांगितले. आसाम पोलिसांसह संयुक्त कारवाई करून मुकादीर इस्लाम, रणजित अली आणि जमील लुइत या तिघांना अटक करण्यात आल्याचे दिल्लीचे पोलीस उपायुक्त (विशेष विभाग) प्रमोदसिंह कुशवाह यांनी सांगितले.

आयसिसच्या विचारसरणीने प्रभावित होऊन आसामच्या गोलपारा जिल्ह्य़ात सोमवारी होणाऱ्या स्थानिक महोत्सवामध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा त्यांचा कट होता, त्याचप्रमाणे दिल्लीतील दाट वर्दळीच्या ठिकाणीही हल्ला करण्याचा त्यांचा कट होता, असे कुशवाह यांनी सांगितले. या तिघेही वर्गमित्र असून त्यांनी दिल्लीतील काही जणांचेही कट्टरीकरण केल्याचे कुशवाह म्हणाले. त्यांच्याकडून एक किलो स्फोटक साहित्य, एक तलवार, एक चाकू हस्तगत करण्यात आला आहे.