गुवाहाटी/ ऐझॉल : आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमावादातून अचानक घडलेल्या हिंसाचारात सोमवारी आसामचे सहा पोलीस ठार झाले, तर ५० जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस अधीक्षकाचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीमासंघर्षांतून घडलेल्या या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांवर दोषारोप केले आणि या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.

हिंसाचारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. वादग्रस्त सीमेवर शांतता राखण्यात यावी आणि सीमाप्रश्नावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढावा, अशा सूचना शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या.

आसाम पोलीस दलाचे सहा पोलीस कछर जिल्ह्य़ातील वादग्रस्त सीमेवर गोळीबारात ठार झाल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. तर आसाम पोलिसांनी मिझोराम पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करून बेछूट गोळीबार केल्यामुळे मिझोराम पोलिसांनी प्रत्यत्तरादाखल गोळीबार केला, असा बचाव मिझोरामचे गृहमंत्री लालचमलियाना यांनी केला.

दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले. हा भाग वादग्रस्त असल्याचे दोन्ही राज्यांच्या पोलीस दलांनी यापूर्वी मान्य केले आहे. त्यांच्यातील या कराराचे उल्लंघन आसाम पोलिसांनी केल्याने हिंसाचार उसळल्याचे सांगण्यात येते. दोन्ही पोलीस दलांतील ही धुमश्चक्री सुमारे सहा तासांहून अधिक काळ सुरू होती.

सीमावाद काय? आसामच्या बराक खोऱ्यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्य़ांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. त्यातून गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आणि यावर्षी फेब्रुवारीत संघर्ष झाला होता.

केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांना या वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six policemen killed 50 injured in assam mizoram border clash zws
First published on: 27-07-2021 at 04:09 IST