केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शबरीमला मंदिरासंबंधी केलेल्या आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, ‘शबरीमला मंदिरासंबंधी केलेल्या माझ्या वक्तव्यावर चर्चा होत असल्या कारणाने मला त्यावर आपलं म्हणणं मांडायचं आहे. एक हिंदू असल्या कारणाने आणि एका झोराष्ट्रीयन व्यक्तीशी लग्न केलं असल्या कारणाने अग्निदेवतेच्या मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी नाही’.

‘मी झोराष्ट्रीयन समाज आणि त्यांच्या पुजाऱ्यांचा आदर करते. दोन झोराष्ट्रीयन मुलांची आई असल्या कारणाने आणि पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी मी कोणत्याही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला नाही. त्याचप्रमाणे मासिक पाळीदरम्यान झोराष्ट्रीयन किंवा अन्य महिला कोणत्याही अग्निदेवतेच्या मंदिरात प्रवेश करु शकत नाही’, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, ‘एखाद्या मित्राच्या घरी पाळीच्या रक्ताने भरलेल्या नॅपकीनसह प्रवेश कराल या माझ्या वक्तव्यावर टीका करण्याचा प्रश्न आहे तिथपर्यत मला अद्याप कोणी असं भेटलेलं नाही ज्याने असं केलं आहे’. ‘मात्र मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि हसू येतं की एक महिला म्हणून मला माझं मत मांडण्याचा अधिकार नाही. जर उदारमतवादी दृष्टीकोनाचा प्रश्न असेल तर मला मान्य आहे. पण हे किती उदारमतवादी आहे ?’, असंही त्या बोलल्या आहेत.

काय म्हणाल्या होत्या स्मृती इराणी –
रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. देवाच्या मंदिरात जाणं आणि तिथे जाऊन प्रार्थना करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला आहे. तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकत नाही तर मग देवाच्या मंदिरात तुम्ही जाताना त्या अवस्थेत कशा काय जाल? असा प्रश्नही स्मृती इराणींनी विचारला आहे.
महिलांना मासिक पाळी येते ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. अशा अवस्थेत तुम्ही मंदिरात जाण्याचा हट्ट आणि प्रार्थना करण्याचा हक्क कसा काय बजावू शकता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे असेही इराणी यांनी म्हटले आहे. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑबझर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशनतर्फे एक परिषद आयोजित करण्यात आली होती त्या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी त्यांचे मत मांडले आहे. सुप्रीम कोर्टाने महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार दिला आहे मी एक केंद्रीय मंत्री म्हणून त्यावर मत नोंदवू शकत नाही पण माझे व्यक्तीगत मत मी इथे व्यक्त केले आहे.

मी एक हिंदू आहे आणि एका पारशी माणसाशी लग्न केले. माझ्या मुलांना मी झोराष्ट्रीयन परंपरा शिकवते आहे. जेव्हा मी माझ्या बाळाला घेऊन अंधेरी येथील अग्यारीमध्ये गेले तेव्हा मी माझ्या बाळाला माझ्या नवऱ्याकडे दिले कारण तिथे मला इथे उभ्या राहू नका असे सांगण्यात आले होते. माझा नवरा आमच्या बाळाला अग्यारीमध्ये घेऊन गेला. कारण पारशी धर्मीयांशिवाय तिथे कोणीही येऊ नये असा नियमच आहे. तो मी पाळला, आजही तो जेव्हा अग्यारीत जातो तेव्हा मी रस्त्यावर किंवा कारमध्ये त्याची वाट पाहते.

केरळच्या शबरीमाला मंदिरात प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिक लोक याचा विरोध करीत आहेत. मागील बुधवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर महिलांना येथे प्रवेशापासून रोखण्यात आले. दरम्यान, पंबा येथील डोंगर चढून वार्तांकनासाठी मंदिरात प्रवेश करु पाहणाऱ्या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या महिला पत्रकार सुहासिनी राज आणि त्यांच्या पुरुष सहकाऱ्याला आंदोलकांनी अडवले, त्यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि दगडफेक करीत परत पाठवून दिले. आता स्मृती इराणी यांनी या मंदिर प्रवेशाबाबत मांडलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठू शकते यात शंका नाही.