उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी कॅण्डल मार्च काढणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार टीका केली आहे. याच राहुल गांधींनी कधी काळी गायत्री प्रसाद प्रजापतीचे समर्थन केले होते त्याची आठवण इराणींनी करुन दिली आहे. समाजवादी पार्टीचा नेते गायत्री प्रसाद प्रजापतीवर अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईवर बलात्कार केल्याचा आरोप होता.

राहुल गांधींनी याआधी गायत्री प्रसाद प्रजापतीचे समर्थन केले होते. यावेळी भूमिका घेणे त्यांना भाग होते. पण अमेठीला सत्य काय ते माहिती आहे. या प्रकरणांमध्ये न्याय होईल असा मला विश्वास आहे असे इराणी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री असलेल्या स्मृती इराणी दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आल्या आहेत. कठुआ आणि उन्नाव सारख्या घटनांवरुन राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. तपास यंत्रणा आणि सरकारने आवश्यक पावले उचलली आहेत. काही लोक अशा घटनांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत असे इराणी म्हणाल्या. उन्नाव बलात्कार प्रकरणात कठोर कारवाई होईल असे आश्वासन त्यांनी दिले.