ज्यांना काँग्रेस पसंत नसेल त्यांनी दुसऱ्या पक्षात जावे किंवा नवा पक्ष काढावा, असा  सल्ला काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांनी राज्यसभेचे खासदार व ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांना दिला.

तर ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री  पी. चिदंबरम यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसने छतीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थानमधील विधानसभा निवडणूक जिंकली होती. पण, पोटनिवडणुकीत हार पत्करावी लागली. बिहारमध्ये  राजद-काँग्रेस महाआघाडी जिंकू शकली असती, पण, संघटनाच मजबूत नाही, अशी टीका चिदंबरम यांनी केली आहे.

अधीर रंजन यांच्या म्हणण्यानुसार, टीकाकार नेते सोनिया व राहुल यांच्या विश्वासातील होते, त्यांना नेतृत्वाकडे आपले म्हणणे मांडता आले असते. पण, मतभेद जगजाहीर करून काँग्रेसला खजील होण्याची वेळ आणणे योग्य नव्हते.  या नेत्यांना (कपिल सिबल) काँग्रेसची इतकी काळजी होती तर बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वत:हून काम का केले नाही, असा सवालही रंजन यांनी केला.

बिहार निवडणुकीतील पराभवानंतर कपिल सिबल यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता पक्षनेतृत्वावर टीका केली. पक्षासाठी  आत्मपरीक्षणाचे दिवस संपले असून पक्षाने संघटनात्मक दुबळेपणाची कबुली द्ययला हवी, अशी भूमिका सिबल यांनी मांडली. त्यावरून काँग्रेसमध्ये वादंग माजला असून राहुल गांधी यांचे निष्ठावान ‘बंडखोर’ नेत्यांना प्रत्युत्तर देत आहेत.

ज्या पक्षांची संघटना मजबूत त्यांना यश मिळाल्याचे बिहारमध्ये भाकप-माले, एमआयएम यांनी जिंकलेल्या जागांवरून दिसते. विरोधी पक्षांची आघाडी करून भाजप इतकी मते मिळवता येतील पण, भाजपचा पराभव करायचा असेल तर संघटना मजबूत असावी लागेल, असे मत चिदंबरम यांनी मांडले. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) बैठकीत कोणाला पक्षाध्यक्ष केले जाईल हे सांगता येणार नाही पण, पक्षाध्यक्षपदाची निवडणूक कोणालाही लढवता येऊ शकते, असे सांगत चिदंबरम यांनी बिगरगांधी पक्षाध्यक्षाच्या निवडीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला.

चिदंबरम यांच्याकडून पाठराखण

मात्र, राज्यसभेतील सिबल यांचे सहकारी पी. चिदंबरम यांनी त्यांची पाठराखण केली आहे. पोटनिवडणुकीतील पराभवाने या राज्यांमध्ये काँग्रेसचे संघटनात्मक अस्तित्व नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोना, आर्थिक आघाडीवर घसरण यासारखे सरकारविरोधी भक्कम मुद्दे असताना देखील काँग्रेसची निवडणुकांमध्ये पिछेहाट झाली ही खरी चिंतेची बाब असल्याचे टिप्पणी चिदंबरम यांनी केली. बिहारमध्ये देखील राजद-काँग्रेस आघाडीला जिंकण्याची चांगली संधी होती तरीही पराभव का झाला याचे मूल्यमापन करण्याची गरज असल्याचेही चिदंबरम म्हणाले.