२०१९ मधील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला म्हणजे आज होत असून पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून ते दिसणार आहे. विशेष म्हणजे भारतामधील अनेक शहरांमधून हे ग्रहण पाहता येणार आहे. जाणून घेऊयात कधी कुठे आणि कसं पाहता येणार आहे हे ग्रहण…

कोणत्या देशांमधून दिसणार?

> भारत

> सौदी अरेबिया

> कतार

> मलेशिया

> ओमान

> सिंगापूर

> श्रीलंका

> मरिना बेटे

> बोरनिओ

कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी…

या ग्रहणादरम्यान ‘रिंग ऑफ फायर’ म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे ग्रहण दिसणार असून ते कंकणाकृती असेल. खग्रास सूर्यग्रहणापेक्षा ते वेगळे असेल. यातच सूर्याचा मधला भाग चंद्र मध्ये आल्याने झाकला जातो. त्यामुळे त्याची कडा प्रकाशमान दिसते, त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते.

भारतात कधी दिसणार?

भारतात सकाळी ७.५९ वाजता ग्रहणाला सुरुवात होणार आहे. यात कंकणाकृती अवस्था सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी दिसणार आहे. जास्तीत जास्त भाग झाकला जाण्याची अवस्था सकाळी १०.४७ वाजता राहील. पूर्ण ग्रहण स्थिती सुटण्यास दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होईल, दुपारी १.३५ वाजता खंडग्रास अवस्थेतून तो बाहेर पडेल.

कंकणाकृती सूर्यग्रहण कुठून दिसणार

एकलिप्स पोर्टलच्या मते कंकणाकृती सूर्यग्रहण पूर्व सौदी अरेबियात दम्ममच्या पश्चिमेला सुरू होईल. ते भारतात दक्षिण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरू होईल. पहिल्यांदा ते कोईमतूरमध्ये कंकणाकृती स्थितीत दिसेल. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे.  स्लूह डॉट कॉम या संकेतस्थळावर सकाळी ८.३० पासून ग्रहणाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

महाराष्ट्रात खंडग्रास

दक्षिण भारतात केरळमधील कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड आणि कर्नाटकातील मंगलोर, म्हैसूर व तामीळनाडूतील कोईमतूर, इरोडे, करुर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई येथून कंकणाकृती दिसेल. महाराष्ट्र  आणि उर्वरित भारतातून ६० ते  ७० टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

निवडक ठिकाणच्या खंडग्रास सूर्यग्रहण स्थिती कशी असेल

मुंबई ७९ %

पुणे ७८ %

सोलापूर ८१ %

कोल्हापूर ८४ %

नाशिक ७४ %

नागपूर ६२ %

जळगाव ६८%

औरंगाबाद ७४ %

अकोला ६८ %

तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा

सूर्यग्रहण असो वा नसो, सूर्याकडे थेट उघडय़ा डोळ्यांनी पाहणे हानिकारक आहे. सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहण्याचा आग्रह धरा. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सुचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद लुटू शकतो, यात शंका नाही.