पत्नीला धडा शिकवण्यासाठी जावयाने सासऱ्याची हत्या केली. दिल्लीच्या पांडव नगर भागात रविवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. घर सोडून गेलेली पत्नी माहेरी राहत असल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला धडा शिकवण्यासाठी तिच्या वडिलांची हत्या केली. प्रभू दयाल असे मृत व्यक्तिचे नाव असून दिल्ली पोलिसांना संध्याकाळी चारच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. प्रभू दयाल यांच्या मुलानेच सर्वप्रथम त्यांना रक्ताच्या थारोळयात पडलेले पाहिले. त्याने लगेच पोलिसांनी माहिती दिली.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी प्रभू दयाल यांना लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात नेले त्यावेळी डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. आरोपी नीरज फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके स्थापन केली आहेत अशी माहिती डीसीपी पंकज सिंह यांनी दिली. नीरजचे डिसेंबर २०१६ मध्ये दयाल यांच्या मुलीबरोबर लग्न झाले. हा प्रेमविवाह होता. लग्नानंतर काही आठवडयातच या जोडप्यामध्ये खटके उडू लागले.

त्यांच्यातील भांडण मिटल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांच्यामध्ये भांडण सुरु व्हायचे असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एकदिवस वाद विकोपाला गेल्यानंतर नीरजच्या पत्नीने घर सोडले व वडिलांच्या घरी राहायला गेली. त्यानंतर नीरजने तिला अनेकदा घरी बोलवले पण तिने परत यायला नकार दिला. सर्व प्रयत्न करुन थकल्यानंतर अखेर नीरजने पत्नीला धडा शिकवण्यासाठी तिच्या वडिलांची हत्या केली. नीरज प्रभू दयाल यांच्या घरी आल्यानंतर त्याने चर्चेने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असावा. पण वाद वाढल्यानंतर त्याने प्रभू दयाल यांची चाकूने भोसकून हत्या केली असावी असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.