स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने खोटी शाखा चालवणाऱ्या तीन जणांना तामिळनाडू पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण हा निवृत्त बँक कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त बिझनेस स्टॅण्डर्सने दिलं आहे.

पनरुती येथील पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक अंबिटकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी कमल बाबू नावाचा इसम हा या खोटी शाखा चालवण्यामागील प्रमुख आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. कमलचे आई वडील हे बँकेतील निवृत्त कर्मचारी असून कलम स्वत: बेरोजगार असल्याने त्याने थेट खोटी शाखा सुरु करुन त्या माध्यमातून पैसा कमवण्याचा मार्ग निवडल्याचे सांगण्यात येत आहे. कमलच्या वडीलांचे दहा वर्षांपूर्वीच निधन झालं असून दोन वर्षापूर्वी त्याची आई बँकेतून निवृत्त झाली.

अटक करण्यात आलेले इतर दोघेजण हे बँकेची शाखा चालवण्यासाठी लागणारे खोटं साहित्य पुरवण्याचे काम करायचे. यापैकी एकाची प्रिंटीग प्रेस असून तो खोट्या पावत्या, चलान आणि बँकेशी संबंधित इतर कागदपत्रं छापायचा. तर दुसरा व्यक्ती हा बँकेच्या शाखेत वापरले जाणारे खोटे रब्बर स्टॅम्प बनवण्याचे काम करायचा.

पनरुतीमध्येच असणाऱ्या दोन खऱ्या एसबीआय शाखेपैकी एका शाखेतील एक ग्राहकाने या शाखेसंदर्भातील माहिती बँकेच्या व्यवस्थापकांना दिली. तीन महिन्यापूर्वी शहरामध्ये बँकेची तिसरी शाखा सुरु करण्यात आल्याचे समजले. हे प्रकरण नंतर प्रभागीय अधिकाऱ्यांकडे गेलं. त्यांनी पनरुतीमधील दोन्ही शाखांच्या व्यवस्थापकांना शहरामध्ये एसबीआयच्या दोनच अधिकृत शाखा असल्याची माहिती दिली.  बँकेने शहरामध्ये तिसरी शाखा सुरु केलेली नाही हे प्रभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

त्यानंतर एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी या खोट्या शाखेला भेट दिली. त्यावेळी या खोट्या शाखेतील सर्व सेटअप आणि व्यवस्था ही अगदी खऱ्या बँक शाखेप्रमाणे असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. अगदी जागेपासून ते इतर गोष्टीही हुबेहुब एसबीआयच्या शाखेप्रमाणेच होत्या. या प्रकरणात एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शाखा सुरु होऊन तीनच महिने झाल्याने कोणताही मोठा व्यवहार या शाखेच्या माध्यमातून झाला नसल्याने कोणाचीही फसवणूक झालेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.