पक्षांतर्गत वाद व यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी केलेल्या निदर्शनांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा २१ नोव्हेंबर रोजी होणारा नागपूर दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. त्याचीही माहिती काँग्रेस हायकमांडने मागितली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राजीव गांधी जीवनदायिनी योजनेचा शुभारंभ होणार असल्याने नागपूर दौऱ्यासंदर्भात १० जनपथवर संभ्रमावस्था आहे. आणि दौरा झाला तरी त्यात सोनिया गांधी राजकीय भेटीगाठी घेणार नाहीत, असाही दावा सूत्रांनी केला.
गेल्या आठवडय़ात यवतमाळमध्ये झालेल्या सिंचन परिषदेच्या उद्घाटन समारंभात संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. भाषणादरम्यान विकासाच्या मुद्दयावर मुख्यमंत्र्यांनी बोलण्यास प्रारंभ करताच शेतकऱ्यांनी विदर्भातील प्रश्न, यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांनी तेथून काढता पाय घेतला होता. विशेष म्हणजे यवतमाळ हा प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा आहे. त्यांच्याच जिल्ह्य़ात मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी असल्याचे चित्र सोनिया गांधी यांच्याकडे रंगविण्यात आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह अनेक महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. चव्हाण विरुद्ध ठाकरे असे दोन गट सध्या राज्यात आहेत . पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव व विदर्भातील शेतकऱ्यांच्या काँग्रेसविरोधातील नाराजीची सविस्तर माहिती १० जनपथ घेत आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत सोनिया गांधी यांनी नागपूर दौऱ्यास अनुकूलता दर्शवली नव्हती. त्यामुळे या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. यांसदर्भात राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सोनिया गांधी यांचा दौरा निश्चित आहे. त्यात काहीही बदल झालेला नाही. असा बदल झाल्यास तो नेत्यांना व कार्यकर्त्यांना कळविण्यात येईल. खा. विलास मुत्तेमवार म्हणाले की, दौऱ्याची तयारीही जोरात सुरु आहे.