काँग्रेसची १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल अमेठीतून; तर सोनिया रायबरेलीतून

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह लोकसभेसाठीच्या १५ उमेदवारांची यादी काँग्रेसने गुरुवारी जाहीर केली.

राहुल गांधी हे अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेलीतून पुन्हा निवडणूक लढणार आहेत.  सोनिया गांधी ही निवडणूक लढवतील की नाही, याबाबत माध्यमांत उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने त्या चर्चेला विराम मिळाला आहे.

राज्यात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आधीच युती केली असली तरी या दोन्ही जागा काँग्रेससाठी त्यांनी सोडल्या आहेत. त्यामुळे तेथे काँग्रेस आणि भाजपची थेट लढत होणार असली तरी या दोन्ही जागा काँग्रेसकडेच कायम राहतील, असाच तर्क आहे.

राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची गुरुवारी बैठक झाली. त्यात उत्तर प्रदेशातील ११ आणि गुजरातमधील चार उमेदवारांची नावे निश्चित झाली.

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री हे फैजाबादमधून निवडणूक लढवतील. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद, जितिन प्रसाद आणि आर पी एन सिंग हे अनुक्रमे फारुखाबाद, धौरहरा आणि कुशी नगर या त्यांच्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.

धौरहरा हा मतदारसंघ २००९मध्ये अस्तित्वात आला. तेव्हा पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र जितिन प्रसाद हे मोठय़ा मताधिक्याने निवडून आले. २०१४मध्ये मात्र मोदी लाटेत ते निवडणुकीत पराभूत झाले आणि चौथ्या स्थानावर फेकले गेले. त्यावेळी प्रसाद यांना १६ टक्के मते मिळाली होती, तर भाजपला ३४ टक्के मते पटकावली होती. धौरहरा हा सीतापूर जिल्ह्य़ात येतो आणि हा जिल्हा देशातील सर्वात मागास २५० जिल्ह्य़ांपैकी एक आहे. यावेळी सप आणि बसप आघाडीशीही काँग्रेसला इथे टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

गुजरातचे माजी प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोळंकी यांना आणंदमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पक्षाने सहारणपूरहून इम्रान मसूद, बदायूं येथून सलीम इक्बाल शेरवानी, उन्नाव येथून अन्नू टंडन, अकबरपूरहून राजाराम पाल आणि जालौन राखीव मतदारसंघातून ब्रिजलाल खबरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमध्ये सोळंकी यांच्याबरोबरच राजू परमार हे अहमदाबाद पश्चिम येथून, प्रशांत पटेल हे बडोद्यातून आणि रजणीत मोहनसिंह रठवा हे छोटा उदयपूरहून निवडणूक लढणार आहेत.

प्रियंका यांचे काय?

प्रियंका गांधी या सोनियांऐवजी रायबरेलीतून लढतील, अशीही चर्चा होती. मात्र फुलपूर येथील कार्यकर्त्यांनी सर्वात आधी प्रियंका यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, अशी मागणी केली होती. तसेच तेथून त्यांनी निवडणूक लढावी, अशीही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र या पहिल्या यादीत प्रियंका यांचे नाव नसल्याने त्या निवडणूक लढतील का आणि कुठून लढतील, याची उत्सुकता कायम आहे.