वृत्तसंस्था, कॉरपस ख्रिस्ती, अमेरिका

दक्षिण टेक्सासमध्ये  हन्ना वादळामुळे पाऊस पडून पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याआधी या वादळाने आखाती किनाऱ्यावर पाऊस झाला होता. अमेरिकेत करोनाचा फटका बसलेल्या भागास या चक्रीवादळाने तडाखा  दिला असून २०२० मधील हे पहिले अ‍ॅटलांटिक चक्रीवादळ आहे.

शनिवारी दुपारी एक तासाच्या अंतराने या वादळाने दोनदा भूस्पर्श केला. सायंकाळी पाच वाजता पोर्ट मॅन्सफिल्डच्या उत्तरेला या वादळाने पहिला भूस्पर्श केला. हे ठिकाण कॉर्पस् ख्रिस्ती या ठिकाणापासून २०९ कि.मी. अंतरावर आहे. पूर्व केनडी परगण्यात वादळाने दुसरा भूस्पर्श केला. पहिल्या भूस्पर्शावेळी त्याचा वेग २४ कि.मी. होता. तो दुसऱ्या भूस्पर्शावेळी ताशी १४५ कि.मी. झाला. हवामानतज्यांनी रविवारी हन्ना वादळाचा धोका तुलनेने कमी असल्याचे म्हटले होते. या वादळाचा कमाल वेग ताशी सत्तर मैल होता.

टेक्सासच्या अनेक भागात सध्या करोनाचे रुग्ण असताना आता तेथे वादळाचा फटका बसला आहे. हवामानशास्त्रज्ञ ख्रिस बिर्चफिल्ड यांनी सांगितले की, लोकांनी सतर्क राहावे, हन्ना वादळाची तीव्रता कमी झाली असली तरी अजूनही पावसाची शक्यता आहे. या वादळामुळे पावसानंतर पुराचा धोका आहे. रविवारी रात्री ६ ते १२ इंच पावसाची शक्यता आहे. एकूण १८ इंच पावसाने पुराचा धोका आहे. दक्षिण टेक्सासमधील काही भागात ९ इंच पाऊस झाला आहे. त्यात कॅमेरून परगण्याचा समावेश आहे. मेक्सिको सीमेवरील हा  भाग असून  ब्राऊन्सव्हिले भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हन्ना वादळावर प्रशासनाचे लक्ष असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले असून डग्लस हे दुसरे वादळ पॅसिफिक महासागरातून हवाईकडे येत आहे.