आम्ही आधी मुस्लिम आहोत त्यानंतर भारतीय असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते माविया अली यांनी केलं आहे. माविया अली यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची चिन्हं आहेत. उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात यावा आणि राष्ट्रगीत म्हटलं जावं असा आदेशच काही दिवसांपूर्वी काढण्यात आला होता, यावर प्रतिक्रिया देताना माविया अली यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मदरशांमध्ये स्वातंत्र्यदिवस साजरा केला जावा, राष्ट्रगीत म्हटलं जावं आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करावं या आदेशातून हे स्पष्ट दिसून येतं आहे की योगी आदित्यनाथ सरकार मुस्लिम विरोधी आहे. आम्ही योगी आदित्यनाथ सरकारचा हा आदेश मुळीच मानणार नाही, कारण आम्ही आधी मुस्लिम आहोत आणि मग भारतीय. कोणीही आमच्या धर्माच्या आड येऊ नये, आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आम्ही मुस्लिम आहोत आणि आमच्या धर्माच्याच बाजूनं उभे राहणार असंही माविया अली यांनी म्हटलं आहे.

माविया अली यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्रज्ञा यांची हत्या करण्यात आली तर काहीही नुकसान होणार नाही असं वक्तव्य माविया अली यांनी २०१५ मध्ये केलं होतं.

अल्पसंख्याक मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी मदरशांमध्ये स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात यावा आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावं असे आदेश दिले होते. यावरून वाद सुरू झाला आहे, उत्तर प्रदेश सरकारचा हा आदेश जर राज्यातील सगळ्या शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांसाठी लागू केला असता तर आम्ही कोणताही विरोध दर्शवला नसता, मात्र फक्त मदरशांसाठीच हा आदेश देण्यात आला आहे. यावरूनच हे स्पष्ट होतं की हे सरकार आमच्या देशभक्तीवर संशय घेतं आहे अशी टीका ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य खलिद रशिद फिरंगी यांनी ‘पीटीआय’शी बोलताना केली आहे.