प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने विकसित केलेल्या स्टारशिप रॉकेटचा बुधवारी लँडिंग दरम्यान टेक्सास येथील तळावर स्फोट झाला. या रॉकेटच्या स्फोटाचे लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्डींग झाले आहे. स्टारशिप रॉकेटने यशस्वी उड्डाण केले पण लँडिंग दरम्यान स्फोट झाला. चंद्र तसेच मंगळापर्यंत माणसं आणि १०० टनापर्यंत सामान वाहून नेण्यासाठी मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने या १६ मजली स्टारशिप रॉकेटची निर्मिती केली आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

स्टारशिप एक स्वयंचलित रॉकेट आहे. लँडिंग पॅडला स्पर्श करताना या रॉकेटचा स्फोट झाला व सर्वत्र एकच आगीचे लोळ उठले. टेस्ट फ्लाईट दरम्यान ४१ हजार फूटापर्यंतची उंची गाठण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले होते. स्पेसएक्सने नव्याने विकसित केलेल्या रॅप्टर इंजिनचा प्रथमच या मध्ये वापर करण्यात आला. रॉकेटने अपेक्षित उंची गाठली का? ते स्पेसएक्सने स्पष्ट केले नाही.

“लँडिंगच्यावेळी इंधन टाकीवरील दबाव कमी होता. त्यामुळे रॉकेट जास्त गतीने उतरताना स्फोट झाला” असे दुर्घटनेनंतर इलॉन मस्क यांनी लगेच टि्वट करुन सांगितले. चाचणीमधून सर्व आवश्यक डाटा आम्ही मिळवला आहे. मस्क यांनी टीमचे अभिनंदनही केले. भविष्यात मंगळ आणि चंद्र मोहिमाच्या दृष्टीने मस्क यांची स्पेसएक्स कंपनी या शक्तीशाली रॉकेटची उभारणी करत आहे. स्टारशिप रॉकेटसाठी नासाने स्पेसएक्सला १३ कोटीपेक्षा जास्त डॉलर्सची मदत केली.