वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचा संस्थाप झाकीर नाईकच्या मुंबईतील पाच मालमत्तांवर टाच आणण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या मुंबईतील कोर्टाने दिले आहेत. झाकीर नाईकसाठी हा मोठा धक्का मानला जात असून तपास यंत्रणांनी झाकीर नाईकभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केल्याचे दिसून येते आहे.

दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली एनआयए आणि ईडी यांच्यातर्फे संयुक्त कारवाई होण्याची भीती झाकीर नाईकला होती. त्यामुळेच तो भारताबाहेर पळाला आहे. त्याच्या संपत्तीवर टाच आणली जाणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

झाकीर नाईक हा इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा (आरआरएफ) संस्थापक आहे. त्याने २०१६ मध्ये भारतातून पलायन करत मलेशियात मुक्काम हलवला आहे. त्याला तिथे स्थायी रहिवासास परवानगी देण्यात आली आहे. दहशतवादी कृत्यास अर्थपुरवठा करणे आणि द्वेष पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तो भारताला हवा आहे.