करोनामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज एकाच वेळी नाही

नवी दिल्ली : देशात करोनाचा उद्रेक सुरू असला तरी संसदेचे पावसाळी अधिवेशन घेतले जाणार आहे. त्यासाठीची तयारी चालू आठवडय़ाच्या अखेपर्यंत पूर्ण होईल. संसद सदस्यांना अधिवेशनात प्रत्यक्ष सहभागी होता यावे यासाठी राज्यसभा सचिवालयाला राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आदेश दिल्याची माहिती रविवारी राज्यसभेच्या प्रसिद्धी विभागाने दिली.

संसदेच्या दोन्ही सभागृहांतील कामकाजावेळी सदस्यांना करोनाप्रतिबंधात्मक नियमांचे पालन करता येईल, अशी विशेष व्यवस्था केली जाईल. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज एकाच वेळी न होता ते दिवसातील पूर्वार्ध व उत्तरार्धात विभागले जाईल. दोन्ही सभागृहे व त्यांचे चार वेगवेगळे कक्ष यांचा वापर सदस्यांच्या आसनासाठी केला जाईल. सदस्यांना कामकाजात सहभागी होता यावे यासाठी मोठय़ा आकाराचे दूरचित्रवाणी स्क्रीन लावले जातील. सभागृहांत विषाणूप्रतिबंधक अतिनील किरणयंत्रांचा वापर केला जाईल. लोकसभा व राज्यसभा यांना विशेष ध्वनीतारांनी जोडले जाणार असून त्याद्वारे दुसऱ्या सभागृहात वा कक्षात बसलेल्या सदस्यांचे बोलणे ऐकता येईल. या विशेष तयारीची रंगीत तालीम या आठवडय़ात केली जाणार आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ मार्च रोजी संपले. परंपरेनुसार पुढील अधिवेशन सहा महिन्यांचा कालावधी संपण्यापूर्वी घ्यावे लागते. त्यामुळे पावसाळी अधिवेशन २३  सप्टेंबरपूर्वी सुरू करावे लागेल. दरवर्षी पावसाळी अधिवेशन जुलै-ऑगस्ट महिन्यात होते पण, करोनामुळे ते पुढे ढकलावे लागले असून आता ते सप्टेंबरच्या पूर्वार्धात होऊ शकेल. त्यासाठी गेले दोन आठवडे संसदेच्या दोन्ही सभागृहांची सचिवालये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामाला लागली आहेत.

१७ जुलै रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी घेतलेल्या बैठकीत अधिवेशनाच्या तयारीचा निर्णय झाला.

कामकाजासाठी व्यवस्था कशी असेल?

* प्रत्येक सभागृहाच्या कामकाजासाठी दुसरे सभागृह व त्याच्या कक्षांचा वापर. तिथे मोठे स्क्रीन, कक्षांत छोटे स्क्रीन, विषाणूविरोधक व्यवस्था, ध्वनियंत्रणा.

*  राज्यसभेच्या २४३ सदस्यांपैकी ६० सदस्य वरिष्ठ सभागृहात बसतील, ५१ सदस्य सभागृहाच्या वरील कक्षांमध्ये असतील, उर्वरित १३२ सदस्यांची आसनव्यवस्था लोकसभेच्या सभागृहात व कक्षांमध्ये केली जाईल. प्रत्येक पक्षासाठी विभागवार जागा असेल.

*  राज्यसभेत पंतप्रधान, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि पक्षाचे सभागृह नेते यांच्या जागा चिन्हांकित केल्या जातील. तसेच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व एच. डी. देवेगौडा, केंद्रीयमंत्री रामविलास पासवान व रामदास आठवले यांच्या जागा निश्चित केल्या जातील. अन्य मंत्री मात्र पक्षांसाठी निश्चित केलेल्या विभाग-कक्षांमध्ये बसतील. इतर वेळी प्रत्येक सदस्याचे आसन क्रमांक ठरलेले असते. यावेळी विशेष सुविधांमुळे ही रचना बदलली जाईल. अशीच आसनव्यवस्था लोकसभा सदस्यांसाठीही असेल.

*  अधिकारी कक्ष व पत्रकार कक्षात एकावेळी १५ जणांना बसण्याची परवानगी असेल. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने कामकाजात सहभागी होण्यात सदस्यांना अडचण येणार नाही.