संपूर्ण जगभरात हाहाकार माजविलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव चीनमधील प्रयोगशाळेतून झाला असण्याची शक्यता नाही, तर काही प्राण्यांच्या प्रजातींमधून मानवाला त्याची लागण झाली असावी, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ज्ञांनी मंगळवारी नोंदविला.

चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वुहान शहरात डिसेंबर २०१९ मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, त्यामुळे डब्ल्यूएचओच्या पथकाने वुहान हेच करोनाचे मूळ उगमस्थान आहे का, या बाबत तपास केला. डब्ल्यूएचओचे अन्न सुरक्षा आणि प्राण्यांना होणाऱ्या रोगांचे तज्ज्ञ पीटर बेन एमबारेक यांनी तपासातून उघड झालेल्या माहितीच्या सारांशामध्ये वरील निष्कर्ष व्यक्त केला आहे.

वुहान विषाणूशास्त्र संस्थेने मोठय़ा प्रमाणावर विषाणूंचे नमुने गोळा केले, त्यामुळे या संस्थेतूनच हा विषाणू आजूबाजूला पसरला असा आरोप केला जातो. ही प्रयोगशाळाच करोनाचे मूळ असल्याचेही म्हटले जात होते. मात्र चीनने याचा स्पष्टपणे इन्कार केला होता. या संस्थेसह डब्ल्यूएचओच्या पथकामध्ये १० देशांमधील तज्ज्ञांचा समावेश होता. या तज्ज्ञांनी रुग्णालये, संशोधन संस्था, बाजारपेठ आणि अन्य ठिकाणांना भेटी दिल्या.

वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावानंतर चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ पथकाच्या दौऱ्यास मान्यता दिली. अनेक महिन्यांनंतर हे पथक तेथे पोहोचू शकले. करोनाच्या उगमाबाबत स्वतंत्रपणे तपास करण्याची मागणी चीनकडून सातत्याने फेटाळण्यात येत होती.   विषाणूबाबत चीनच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले होते. करोनामुळे जगभरात आतापर्यंत २.२ दशलक्ष जणांचा मृत्यू झाला आहे.