सत्या सरण यांच्या पुस्तकात दावा
पाकिस्तानच्या पहिल्या भेटीत गझलसम्राट जगजित सिंग यांना भरपूर श्रोते लाभले, मात्र पाकिस्तानच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने त्यांच्यावर पाळत ठेवली होती, असे या गायकावरील एका नव्या पुस्तकात म्हटले आहे.
सत्या सरण यांनी लिहिलेल्या आणि हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केलेल्या ‘बात निकलेगी तो फिर – दी लाइफ अँड म्युझिक ऑफ जगजित सिंग’ या पुस्तकामध्ये वरील घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे.
आम्ही पाकिस्तानला गेलो त्या वेळी तेथील वातावरणातील तणाव आम्हाला जाणवत होता. आम्ही विमानतळावर उतरलो तेव्हा एक माणूस विमानात शिरून उभा राहिलेला आम्ही पाहिला. तो आमच्या मागे आला आणि पुन्हा हॉटेलमध्येही आम्हाला दिसला. ही गोष्ट धीर खचवणारी होती. खोलीची बेल वाजल्यानंतर जगजितने दार उघडले, तेव्हा तोच माणूस बाहेर उभा होता. तो आत आला, तेव्हा ‘तुम्ही आमच्या मागावर आहात काय?’, असे जगजित सिंग यांनी त्याला पंजाबीत विचारले, असे चित्रा सिंग यांनी सांगितल्याचे पुस्तकात म्हटले आहे.
‘मी तुमचा फॅन आहे’, असे सांगून त्या गुप्तचर पोलिसाने आमच्या खोलीत आवाज रेकॉर्ड करणारे यंत्र ठेवण्यात आल्याची खूण केली. आपण गुप्तचर विभागातून आल्याचे सांगून त्या इसमाने त्याच्या जॅकेटमधून कागदात गुंडाळलेली एक मद्याची बाटली काढून दिली.असे त्या दौऱ्यात पतीसोबत गेलेल्या चित्रा सिंग यांनी सांगितले.
पाकिस्तानने या दाम्पत्याला जाहीर कार्यक्रम करण्यास बंदी घातली होती, परंतु त्यांनी प्रेस क्लबचे खासगी आमंत्रण स्वीकारले. दुसऱ्या दिवशी त्यांनी तत्कालीन भारतीय राजदूत शंकरदयाल शर्मा यांच्या घरी एक खासगी मैफल केली आणि त्यानंतर त्यांना कार्यक्रमाची अनेक आमंत्रणे मिळाली, असे पुस्तकात नमूद केले आहे.