श्रीलंकेत राजकीय संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. श्रीलंकेचे पदच्च्युत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू समर्थक आणि पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे. रविवारीच रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दोन जण जखमी झाले होते.

सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (सीपीसी) परिसरात गोळीबार घडला. गोळीबार करणाऱ्या रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याने गोळीबाराच्या पाच फैरी झाडल्या. त्यात राजपक्षे यांचे तीन समर्थक जखमी झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचाराआधीच मृत्यू झाला. पदच्च्युत विक्रमसिंघे सरकारमधील पेट्रोलियममंत्री आणि माजी क्रिकेटपटू रणतुंगा रविवारी सीपीसी कार्यालयास भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या भेटीला अनेक पेट्रोलियम कामगारांनी तीव्र आक्षेप घेतला.

रणतुंगा यांनी सीपीसीच्या इमारतीत प्रवेश करताच नवनियुक्त पंतप्रधान राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजपक्षे यांच्या समर्थकांनी रणतुंगा यांचा मार्ग रोखल्याने त्यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळीबार केला. त्यात तिघे जखमी झाले. त्यापैकी एक जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारप्रकरणी रणतुंगा यांच्या दोन सुरक्षारक्षकांना अटक करण्यात आली होती.

रणतुंगा हे विक्रमसिंघे यांचे समर्थक आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी शुक्रवारी रात्री विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवून त्यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांची नियुक्ती केली. त्यामुळे श्रीलंकेत सत्तासंघर्ष पेटला आहे. त्यातूनच आजचा गोळीबाराचा प्रकार घडला.