कोलंबो : श्रीलंका सरकार आणि तमिळी बंडखोरांमध्ये अनेक दशके सुरू असलेल्या नागरी युद्धात बेपत्ता झालेले हजारो जण मरण पावल्याचे श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष यांनी प्रथमच मान्य केले आहे.

याबाबतचा आवश्यक तो तपास पूर्ण झाल्यानंतर बेपत्ता झालेल्यांची मृत्युप्रमाणपत्रे जारी करण्याबाबत पावले उचलण्यात येतील, असेही राजपक्ष यांनी सांगितले. राजपक्ष हे युद्धकाळात देशाचे संरक्षण सचिव होते. संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक हाना सिंगर यांच्यासमवेत झालेल्या चर्चेच्या वेळी राजपक्ष यांनी ही माहिती दिली. श्रीलंकेतील तमिळी बंडखोरांबरोबरच्या संघर्षांच्या वेळी २० हजारांहून अधिक जण बेपत्ता झाले होते, त्याचप्रमाणे या संघर्षांत किमान एक लाख जण ठार झाले होते. युद्धाच्या अंतिम टप्प्यात हजारोंचे हत्याकांड घडविण्यात आल्याचा आरोप तमिळींनी केला, एलटीटीईचा नेता व्ही. प्रभाकरन याला ठार केल्यानंतर २००९ मध्ये हे युद्ध संपुष्टात आले होते.